अनिल कांबळे

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने तृतीयपंथीयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार पोलीसभरतीसाठी अर्ज करण्यास तृतीयपंथीयांना संधी देण्यात आली; परंतु त्यांच्या शारीरिक चाचणीबाबत अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील पोलीसभरतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शासकीय नोकरीचा अर्ज भरण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर केवळ स्त्री आणि पुरुष असे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे सप्टेंबर २०२२ मध्ये दोन तृतीयपंथींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयानेही तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पुरुष, महिला आणि तृतीयपंथी असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांना पोलीसभरतीसाठी पात्र ठरविण्यात आले. जानेवारी महिन्यांपासून भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरू आहे. मात्र, तृतीयपंथीयांच्या चाचणीबाबत पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. शारीरिक चाचणीचे निकष फेब्रुवारीपर्यंत ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुरुष व महिलांसाठीचे निकष..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी उंची १६५ सें.मी., १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळाफेक (७.२६० किलो) तर महिला उमेदवारांसाठी उंची १५८ सें. मी. ८०० मीटर धावणे, १०० मीटर, गोळाफेक (फक्त ४ किलो) अशी पात्रता ठरवण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांच्या चाचणीच्या निकषांबाबत अद्याप पोलीस महासंचालक कार्यालयातून सूचना किंवा निर्देश आले नाहीत. त्यामुळे तृतीयपंथीयांची शारीरिक चाचणी घेण्यात आली नाही. वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर चाचणी घेण्यात येईल. – अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालय, नागपूर</p>