वर्धा : कोणत्याही परीक्षेत जेवढे विद्यार्थी तेव्हड्या प्रश्नपत्रिका तर असतातच मात्र प्रसंगी अधिक पण देऊन ठेवल्या जातात. वेळेवर अडचण येवू नये, असा हेतू. मात्र आता शासन घेत असलेल्या एका परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा घेणारे म्हणतात हा संभ्रम दूर करायचा कसा.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पॅट म्हणजेच संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येत आहे. इयत्ता दुसरी ते चौथीसाठी प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयासाठी सदर चाचणी होत आहे. दिलेल्या प्रश्नपत्रिकाच वापरण्याचे निर्देश आहेत. यू डायस २०२४ – २५ अंतर्गत असलेली पटसंख्या लक्षात घेऊन शाळा स्तरावर पटसंख्येइतक्याच प्रश्नपत्रिका पोहचविण्याचे निर्देश आहेत. याबाबत दिलेल्या सूचनांचे गंभीरपणे पालन करण्याचे आदेश पण देण्यात आले आहे. विद्यार्थी प्रमाणात या प्रश्नपत्रिका देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची आहे.
शाळा स्तरावर प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढता येणार नाही. काढल्यास त्याचे देयक मिळणार नाही. मोबाईलवरून फोटो काढता येणार नाही. प्रश्नपत्रिका शाळेतून बाहेर नेता येणार नाही. गोपनीयता म्हणून हे दंडक ठेवण्यात आले असल्याचे स्पष्ट आहे. यावर राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेने काही शंका उपस्थित केल्यात. १० ऑक्टोबरपासून या चाचण्या सूरू होणार. मात्र अनेक शाळांना विद्यार्थी संख्येत प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाहीत. या बाबत पर्यवेक्षिय यंत्रणा बोलायला तयार नाहीत. आपल्या स्तरावर सांभाळून घेता येत नाही कां ? असे प्रश्न विचारल्या जातात.
झेरॉक्स काढण्याचा तोंडी सल्ला मिळतो. विद्यार्थी हातासाठी प्रसंगी झेरॉक्स काढू. जरी देयक मिळणार नाही तरी. पण प्रश्नपत्रिका शाळेबाहेर नेण्यास सक्त मनाई करण्यात आल्याने, नेमके काय करावे असं प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. यासाठी तातडीने, यथायोग्य, नियम अनुकूल व गोपनीयता राहील असे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिव व आयुक्तांना आज दिले आहे.
त्यांच्या मते हा तिढा लवकर सुटणे अपेक्षित आहे. कारण परीक्षा उंबरठ्यावर आलेली असतांना परीक्षा घेणारे शिक्षक पेचात पडले आहे. परीक्षेबाबत दिलेले निर्देश कठोर आहेत. एकही विद्यार्थी परीक्षा वंचित राहू नये, ही आमचीच जबाबदारी आहे.