नागपूर : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर सपकाळ हे एका पोलीस अधिकाऱ्यावर चांगलेच संतापल्याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.सपकाळ यांनी सांगितले की, “मी ज्या खोलीत राहतो, त्या ठिकाणी पोलीस शिपाई येतो, झोपण्याच्या खोलीपर्यंत येऊन चौकशी करतो. हे योग्य नाही. हा प्रकार तिसऱ्यांदा घडला आहे, म्हणूनच मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा केली.” त्यांनी पुढे म्हटले की, “ मुंबईत सर्वोदय आश्रमात वास्तव्य करत असताना पोलीस पाळत ठेवत आहेत का? यामागे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत का?”
अतुल लोंढे यांनी या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी. पोलीस आयुक्त देवेन भारती स्वतःच्या मनाने असे प्रकार करत असतील, तर त्यांची एवढी हिम्मत कशी होते? हे प्रकार बंद करावेत.
”लोंढे यांनी पुढे आरोप केला की, “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अशाच प्रकारे पाळत ठेवण्यात आली होती. सरकार विरोधकांवर दबाव टाकण्याचे हे डावपेच आहेत.”या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पोलिसांकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही, मात्र काँग्रेसने राज्य सरकारकडे याबाबत सविस्तर चौकशीची मागणी केली आहे.
