अकोला : केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये २० इथेनॉलचे मिश्रण सुरू केले. या मिश्रित इंधनाच्या वापरामुळे मार्च २०२३ च्या आधीच्या वाहनांचे इंजित खराब होत आहेत. त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. २०३० मध्ये नियोजित असलेले हे धोरण पाच वर्ष अगोदर आणले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुत्रांच्या नावावरील कंपन्यांच्या फायद्यासाठी हे सर्व प्रकार सुरू आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

पेट्रोलमध्ये २० इथेनॉलचे मिश्रणावरून निखिलेश दिवेकर यांनी थेट नितीन गडकरींवर निशाणा साधून या धोरणामुळे त्यांच्या पुत्रांच्या कंपन्यांना प्रचंड मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे सांगितले. मिश्रित इंधनाच्या वापरामुळे मार्च २०२३ अगोदरची वाहने खराब होत आहेत. इंजिनाचे भाग कालांतराने गंजतात. कंपनी ‘वॉरंटी’ अथवा विमा कंपनी याचा खर्च भरून देत नाही. वाहनांची सरासरी १० टक्केपर्यंत कमी होत आहे, असा दावा दिवेकर यांनी केला. 

ब्राझील व अमेरिका सारख्या परदेशात इथेनॉलचे मिश्रण गत पन्नास वर्षाच्या काळात केले. त्याठिकाणी वाहन कंपन्यांनी इंजिनमध्ये आवश्यक ते बदल केले. परदेशात पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पर्याय उपलब्ध असतात. २०१८ मध्ये केंद्र शासनाने २०३० पर्यंत इथेनॉल मिश्रण १० टक्क्यावरून २० टक्के वाढवण्यात येईल, असे स्पष्ट केले असतांना पाच वर्ष अगोदरच त्याची अंमलबजावणी का? असा सवाल करीत पेट्रोलचे दर सुद्धा कमी करण्यात आले नाहीत, अशी टीका देखील निखिलेश दिवेकर यांनी केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कपिल रावदेव उपस्थित होते. 

गडकरी पुत्रांच्या कंपन्यांचे शेअर प्रचंड वाढले

भारतात इथेनॉल बनविणाऱ्या ५०० कंपन्या आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पूत्र सारंग व निखील गडकरी यांच्या सियान व मानस ॲग्रो इंडस्ट्री यांच्याकडूनच बहुतांश इथेनॉल विकत घेतले जाते. त्यामुळे या कंपन्यांच्या समभाग मुल्यात झपाट्याने वाढ झाली. मुलांच्या कंपन्यांना अमर्यादा नफा मिळवून देण्यासाठी इथेनॉल मिश्रणासाठी नितीन गडकरी आग्रही आहेत, असा आरोप निखिलेश दिवेकर यांनी केला आहे.

…तर पाणी पातळीतही घट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी इथेनॉल हे शहरातील कचऱ्यापासून तयार केले जाणार असल्याचे सांगितले होते. आतापर्यंत एक लिटर इथेनॉल सुद्धा कचऱ्यापासून तयार झालेला नाही. ऊस, तांदूळ व मका यापासून इथेनॉल तयार करीत असल्याने भविष्यात अन्नाचा तुटवडा जाणवू शकतो. इथेनॉल बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी घटेल, असा दावाही दिवेकर यांनी केला.