नागपूर : काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील आपल्या क्षमतेचा अंदाज घेतला आहे.

प्रदेश काँग्रेसने निरीक्षकांकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय अहवाल १५ ऑगस्टपर्यंत मागवला आहे. मतदारसंघातील स्थितीचा अंदाज घेण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टाकण्यात आली आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक आणि समन्वयक नियुक्त केले आहेत. त्यांना ७ ते १४ ऑगस्टदरम्यान संबंधित मतदारसंघाचा दौरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे बुधवारी नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते १० ऑगस्टला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, असे वडेट्टीवार यांच्या संपर्क कार्यालयाने कळवले आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या फलकावर अजितदादा-फडणवीस साथसाथ

काँग्रेसने नितीन राऊत यांना चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक प्रणिती शिंदे असतील.

वडेट्टीवार यांना नागपूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक नेमले आहे. वर्धा आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक सुनील केदार यांना करण्यात आले आहे. नंदुरबार आणि धुळे – प्रा. वसंत पुरके, जळगाव, रावेल- डॉ. सुनील देशमुख, बुलढाणा, अकोला-यशोमती ठाकूर, अमरावती-रणजित कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड- सतेज पाटील, हिंगोली, परभणी- अशोक चव्हाण, नांदेड, सोलापूर- बसवराज पाटील, जालना, औरंगाबाद- आरिफ नसीम खान, दिंडोरी, नाशिक – बाळासाहेब थोरात, पालघर, ठाणे-अस्लम शेख, भिवंडी, कल्याण- विश्वजीत कदम, बारामती, शिरूर- कुणाल पाटील, अहमदनगर, शिर्डी- चंद्रकांत हंडोरे, बिड, धाराशिव- अमित देशमुख, लातुर- विलास मुत्तेमवार, माढा, सांगली- हुसैन दलवाई, सातारा- भाई जगताप, कोल्हापूर, हातकणंगलेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना निरीक्षक नेमण्यात आले. याशिवाय समन्वयकदेखील नेमण्यात आले आहेत. निरीक्षकांना समन्वयक आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून दौरा आणि बैठका घ्यायच्या आहेत.

हेही वाचा – फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री, मग स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कुठे लावणार हजेरी? झेंडावंदनावरून सर्वत्र उत्सुकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतील, तेथील राजकीय परिस्थिती, पक्षसंघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून १५ ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करतील व त्यानंतर या अहवालावर चर्चा केली जाईल.” – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.