Premium

बुलढाण्यावर हक्क, काँग्रेसचा मित्रपक्षांवर दबावतंत्राचा भाग? जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे डावपेच?

काँग्रेसच्या या ‘भाऊ-गिरी’मुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी व ठाकरे गटाचे इच्छुक व नेतेमंडळी अस्वस्थ झाली आहेत.

congress claiming right buldhana party trying create pressure mahavikas aghadi
बुलढाण्यावर हक्क, काँग्रेसचा मित्रपक्षांवर दबावतंत्राचा भाग?; जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे डावपेच? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

संजय मोहिते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: बुलढाणा मतदारसंघावर नव्याने हक्क सांगून काँग्रेसने जिल्ह्यातील महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’चा वाद उपस्थित केला आहे. हा मित्रपक्षांवर दबावतंत्राचा भाग व जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे डावपेच असल्याचे मानले जात आहे.

भाजपने वर्षभरापूर्वी ‘मिशन-४५’ जाहीर करून त्यादृष्टीने नियोजनपूर्वक हालचाली सुरू केल्या. यामध्ये शिवसेनेचा २३ वर्षांपासून गड असलेल्या बुलढाणा मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा केला. तसेच सक्षम उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले. शिंदे गटाला दवाबात ठेऊन शिवसेनेची मर्यादित जागेवर बोळवण करण्याचे डावपेच यामागे असल्याची चर्चा आहे. या पाठोपाठ काँग्रेसने बुलढाण्यासह राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघाचा मुंबईत आढावा घेतला. यामागे आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटावर दवाब आणण्याचे छुपे डावपेच आहेत. मित्र पक्षांवर दबावतंत्रांचा वापर करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा हा राजकीय प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा… यवतमाळ : सायबर क्राईम रोखण्यासाठी ‘सोशल मीडिया जनजागृती व्हॅन’

विदर्भातील १० मतदारसंघांपैकी बुलढाण्यापासून बैठकीला सुरुवात करण्यात आल्याने या मतदारसंघासाठी काँग्रेस किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट झाले. केवळ हक्कच न सांगता सहा इच्छुक उमेदवारांची नावेसुद्धा सांगण्यात आली. यामध्ये देखील सर्व समाज घटकातील नावांचा समावेश आहे. यातील एका नावावर खासदार मुकुल वासनिक अंतिम शिक्कामोर्तब करतील, असे सांगण्यात आले. यामुळे काँग्रेस बुलढाण्याबाबत किती गंभीर व तयारीत आहे हे मित्रपक्षांवर बिंबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मित्र पक्ष अस्वस्थ

काँग्रेसच्या या ‘भाऊ-गिरी’मुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी व ठाकरे गटाचे इच्छुक व नेतेमंडळी अस्वस्थ झाली आहेत. तसेच हजारो कार्यकर्ते व सैनिक संभ्रमात पडले आहे. १० बाजार समित्यांच्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन लढणाऱ्या काँग्रेसच्या या अनपेक्षित आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा राष्ट्रवादी व ठाकरे गट गडबडून गेल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीत वादाची नांदी

२००९, २०१४ व २०१९ या तिन्ही निवडणुका राष्ट्रवादीने लढविल्या. विदर्भात त्यांच्या वाट्यावर केवळ दोनच जागा आहे. त्यातल्या एका जागेवर काँग्रेसने दावा केला. शिवसेना १९९६ पासून ही जागा लढवीत आहे. अगोदर आनंदराव अडसूळ व नंतर प्रतापराव जाधव यांनी तब्बल सहावेळा बाजी मारली. शिवसेनेत फूट पडल्यावर उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना असमान दाखवायचे मनसुबे मित्रपक्षांच्या मदतीने आखले, तयारीही सुरू केली. अशातच काँग्रेसने ‘हात’ दाखविल्याने ठाकरे गट गडबडून जाणे स्वाभाविक आहे. काँग्रेसच्या या आग्रहामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची चिन्हे आहे. नजीकच्या काळात काँग्रेस काय डावपेच लढविणार, याकडे आता विरोधकच नव्हे तर दोन्ही मित्रांचेही लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress claiming right on buldhana as party trying to create pressure on mahavikas aghadi scm 61 dvr

First published on: 03-06-2023 at 18:55 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा