चंद्रपूर : भाजपपाठोपाठ गटबाजीत विखुरलेल्या काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या जिल्हा व शहराध्यक्ष निवडीसाठी खलबते सुरू झाली आहेत. काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी काही दिवसांपूर्वी हॉटेल सिद्धार्थ येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर रविवारी पुन्हा आढावा बैठक घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या जिल्हा संघटनेत खांदेपालट होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील गटबाजी शिगेला पोहोचली असतानाच पक्षनिरीक्षक वंजारी यांनी जिल्ह्यातील सर्व १५ तालुके व शहर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत मते जाणून घेतली. या सर्व बैठकांना वडेट्टीवार गैरहजर, तर खासदार धानोरकर हजर होत्या. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व चंद्रपूर शहर काँग्रेस समिती अध्यक्ष रितेश ऊर्फ रामू तिवारी यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. धोटे यांनी पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर नव्या दमाचा अध्यक्ष नेमावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तरुणाच्या हातात नेतृत्वाची धुरा सोपवावी, असाही काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे.
गटबाजी अन् मोर्चेबांधणी
अध्यक्षपदांची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी वडेट्टीवार आणि धानोरकर गटांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही गटबाजी पाहता काँग्रेस श्रेष्ठींकडून यंदा खांदेपालट केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षनिरीक्षक वंजारी काही पदाधिकाऱ्यांना एकट्यात भेटून त्यांची मते जाणून घेत आहेत. यानंतर ते प्रदेश काँग्रेस समितीकडे अहवाल सादर करणार आहेत. पक्षनिरीक्षकांच्या अहवालानंतर जिल्हा व शहराध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.
भाजपची अभिप्राय बैठक आज
भाजपमध्ये जिल्हा व शहराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी अभिप्राय बैठक होऊ घातली आहे. पदाधिकाऱ्यांचे अभिप्राय नोंदवून घेण्यासाठीभाजपचे पर्यवेक्षक माजी आमदार अनिल सोले, ग्रामीण निरीक्षक आमदार प्रवीण दटके, तर शहर निरीक्षक अतुल दराडे चंद्रपुरात येत आहेत.भाजप जिल्हा संघटेनेवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या विरोधात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी दंड थाेपटले आहेत. या दोन्ही गटांकडून जिल्हाध्यक्ष आपल्याच मर्जीतील असावा, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
वर्तमान शहराध्यक्ष राहुल पावडे यांची पुनर्नियुक्ती व्हावी, यासाठी मुनगंटीवार आग्रही आहेत. याशिवाय माजी शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी मुनगंटीवार यांच्याकडून हरीश शर्मा यांचे नाव समोर करण्यात आले आहे, तर ब्रम्हपुरी येथील क्रिष्णा सहारे, विवेक बाढे, नामदेव डाहुले यांचीही नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे, आमदार जोरगेवार यांनी सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंग ठाकूर ही दोन नावे समोर केली आहेत. काँग्रेस पर्यवेक्षक जिल्हा आणि शहराध्यक्षपदाच्या निवडीबाबत आजी-माजी आमदार-खासदार, राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख यांची मते जाणून घेतील. यानंतर पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर प्रदेशपातळीवरूनच या पदांबाबत निर्णय होईल, असे भाजप नेत्याने सांगितले.