अकोला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या कार्यकाळात गरीब, गरजूंसाठी आनंदाचा शिधा वाटप पुरवठा विभागाकडून करण्यात येत होता. ही योजना कायम राहिल्यास एकनाथ शिंदेंचे नाव होऊ शकते.त्यांचे नाव होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंदाचा शिधा बंद केला, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे केली. लाडकी बहीण योजना देखील लवकरच बंद केली जाईल, असेही ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागीय आढावा बैठकीसाठी हर्षवर्धन सपकाळ अकोल्यात आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये कुरघुडी सुरू आहे. एकनाथ शिंदेंना मोठेपण मिळू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा योजना बंद केली. आता काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना देखील बंद केली जाईल. बिहार निवडणुकीत भाजपची प्रचंड वाताहत होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतप्रवाह आहे. बिहार राज्यातील राहुल गांधींच्या जनता यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधींनी मतचोरीचे गंभीर प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली. बिहारच्या निवडणुकीत त्याचा निश्चित प्रभाव पडेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

स्थानिक संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळण्यासाठी मोर्चेबांधणी केली. विभागनिहाय आढावा घेतला जात आहे. निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची चर्चा ही स्थानिक पातळीवर केली जाईल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

पुण्यातील गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणता ‘दादा’?

पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये अमली पदार्थ विकणाऱ्याला कोणी मदत केली? हे महाराष्ट्रासमोर उघड आहे. पुण्यामधील वाढती गुन्हेगारी आणि कोयता गँगच्या पाठीमागे कोणता ‘दादा’ आहे? हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले पाहिजे. पुण्यातील गुन्हेगारीला भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जबाबदार आहे, असे आम्ही आरोप केले होते. आता शिवसेनेच्या शिंदे गटातील धंगेकरांच्या आरोपांमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.