वर्धा : राष्ट्रीय काँग्रेस समितीचे अधिवेशन अहमदाबाद येथे सूरू आहे. त्यात मुख्य कार्यक्रमात पक्षनेते राहूल गांधी, सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व देशातील सर्वच बड्या काँग्रेस नेत्यांची हजेरी लागली. यात अध्यक्षीय भाषण करतांना अध्यक्ष खरगे यांनी केलेले मंदिर प्रवेश घटनेबाबत केलेले वक्तव्य महाराष्ट्रात वेगळ्याच कारणाने गाजत आहे.

अध्यक्ष खरगे यांनी भाषणातून नमूद केले की राम नवमीस एका नेत्याने मंदिरात प्रवेश घेतला. त्यानंतर ते मंदिर अपवित्र झाले म्हणून धुवून काढण्यात आले. ही घटना देवळीचीच अशी चर्चा सूरू झाली. कारण देवळीत राम नवमीस भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना मंदिरात दर्शन घेण्यास गेले असतांना वाईट अनुभव आला. त्यांना सोहळं व जानवे नाही म्हणून गर्भ गृहात जाता येणार नाही, असे खडसावण्यात आले. ही आपबीती त्यांनी जाहीर केली. प्रकरण लोकसत्तातून चव्हाट्यावर येताच देशभर प्रतिक्रिया उमटल्या.

म्हणून याच घटनेचा संदर्भ अध्यक्ष खरगे यांनी अध्यक्षीय भाषण करतांना अहमदाबाद येथे दिला. असा प्रचार सूरू झाला. त्यांच्या मंदीर संदर्भाची क्लिप वेगाने व्हायरल होणे सूरू झाले. मात्र खरेच तसे झाले कां ? तर नाहीच. खरगे यांनी मंदिर प्रवेश वादग्रस्त ठरण्याची बाब वेगळ्या संदर्भात मांडली असल्याचे स्पष्ट होते. या अधिवेशनात उपस्थित जिल्ह्यातील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चारूलता टोकस यांनी देवळी घटनेचा संदर्भ असल्याबाबत खंडण केले.

नेमके काय याबाबत लोकसत्तास माहिती देतांना टोकस म्हणाल्या की अध्यक्ष खरगे यांनी मंदिर वादग्रस्त प्रकरणाचा संदर्भ दिला हे खरे आहे. मात्र तो राजस्थान येथील आहे. राजस्थान विधासभेतील विरोधी पक्षनेते टिकाराम जुली हे दलित समाजातून येतात. ते राम नवमीस राम मंदिरात दर्शन घेण्यास गेले होते. मात्र ते दर्शन आटोपून परत गेल्यावर भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी राम मंदीर गंगाजल टाकून धुवून काढले. आहुजा यांनी दलित अपवित्र असतात म्हणून आम्ही मंदिर धुवून काढले, असे वक्तव्य केल्याची घटना घडली होती. त्याचा संदर्भ खरगे यांनी देत ही बाब अत्यंत लज्जास्पद असल्याचे ते म्हणतात. क्लिप मध्ये तसे स्पष्ट दिसते. पण खरगे यांचा संदर्भ देवळीच्या घटनेबाबतच होता, असा जोरदार दावा सर्वत्र सूरू झाला. संदर्भ कोणता व चर्चा कशाची, असा हा गोधळ आहे.