वर्धा : वर्षभर आणि चोवीस तास राजकारण करणारा नेता म्हणजे शरद पवार. पवार यांची अशी प्रशंसा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरपणे करून चुकले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की जय पराजय याची चिंता नं करता काम करीत राहणारा नेता म्हणजे शरद पवार. पण असे म्हणत असतांना मुख्यमंत्री स्वतःच्या पक्षाचे होणारे गुणगान बाजूला ठेवून गेले. कारण अहोरात्र इलेक्शन मूडच्या तयारीत असणारा पक्ष म्हणजे भाजप, असे आता सर्वमान्य झाले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तर म्हणत असतात की आम्ही पक्ष कार्य दैनंदिन काम म्हणूनच करतो.

आता हेच बघा, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक व्हायला अद्याप एक वर्ष बाकी आहे. मात्र भाजपने ही निवडणूक आता नोंद करीत तयारी सुरू केली पण. आज त्याचे सुतोवाच होणार. कारण जिल्हा कार्यकारिणीची आज सभा होणार असून आगामी नागपूर पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचा मुद्दा अग्रभागी राहणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना मुख्य समन्वयक नेमले आहे. ते आजच्या जिल्हा भाजप बैठकीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर भाष्य करतील. या मतदारसंघात पदवीधर मतदान करतात. त्या पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची तयारी पक्ष नेत्यांवर राहील. जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय ही जबाबदारी सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

सहा वर्षांपूर्वी झालेली ही निवडणूक भाजप उमेदवारीवरून चांगलीच गाजली होती. त्यावेळी मावळते आमदार असलेले प्रा. अनिल सोले यांनाच परत उमेदवारी मिळणार असे बोलल्या जात होते. पण तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर संदीप जोशी यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली होती. सोले हे नितीन गडकरी समर्थक. पण त्यांचा पत्ता कटल्याने जोशी उमेदवारी पक्षांतर्गत प्रभावाचा दाखला म्हणून पाहल्या गेली. पण गडकरी यांनी त्याचे वैषम्य नं ठेवता जोशी यांचा प्रचार पण केला. पण सभेत बोलतांना गडकरी यांनी बोच व्यक्त केल्याची घडामोड चांगलीच चर्चेत आली होती.

राज्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असल्याने सत्ताधारी काँग्रेसने ही निवडणूक मनावर घेत लढविली. बबन तायवाडे यांनी लढण्यास नकार दिल्याने विधानसभा निवडणूक तिकीट नाकरण्यात आलेले अभिजित वंजारी यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी होकार दिला व भाजपला या मतदारसंघात पराभव बघावा लागला. ही बाब देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्याच जिव्हारी लागल्याची चर्चा झाली. पण त्यांनी संदीप जोशी यांना अखेर आमदार केलेच. आता भाजपने या मतदारसंघात इर्षेने तयारी सूरू केल्याचे चित्र आहे. तर आमदार वंजारी गटाचे त्यावेळचे प्रचारप्रमुख डॉ. राजीव जाधव म्हणतात की आम्ही पण शांत बसलेलो नाही. तयारी सुरूच आहे.