नागपूर : काँग्रेसचे आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांच्या भाजपमध्ये जाण्याबद्दल भूमिका स्पष्ट करतानाच मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण काही लोक गेल्याने अनेक वर्षांपासून मला भाजपमध्ये पाठवत आहेत, असा टोलाही त्यांनी त्यांच्या पक्षांर्गंत विरोधकांना लगावला.

शहर काँग्रेसतर्फे नागपूर पत्रकार क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी आगामी नागपूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, आणि त्यासाठी शहर काँग्रेसने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

नवीन फॉर्म्युला : ९०० बुथ पदाधिकाऱ्यांचा सहभाग

यंदा काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय ६० बुथांमधील सुमारे ९०० पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. आवश्यक वाटल्यास, याच पदाधिकाऱ्यांमध्येच निवडणूक घेऊन अंतिम उमेदवार ठरवला जाईल. सध्या हा प्रयोग पश्चिम नागपूरमधील झिंगाबाई टाकळी प्रभागात सुरू झाला असून लवकरच तो संपूर्ण नागपूर शहरात राबवण्यात येणार आहे. हा फॉर्म्युला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असून, यामुळे पक्ष संघटनेला बळकटी मिळेल, तसेच उमेदवाराच्या मागे संपूर्ण बुथस्तरीय यंत्रणा उभी राहील, असा विश्वास आमदार ठाकरे यांनी व्यक्त केला.

भाजपमध्ये जाणाऱ्यांवर अंकुश : शपथपत्राची अट

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्ष निष्ठेची खातरजमा करण्यासाठी उमेदवारांकडून लेखी शपथपत्र घेण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. “कोणताही उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर थेट भाजपमध्ये जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे,’ असे सांगत त्यांनी अरविंद गजभिये यांचा संदर्भ दिला. ‘गजभिये यांना काँग्रेसने संधी दिली, ते प्रकाशझोतात आले आणि नंतर भाजपमध्ये जाऊन जिल्हाध्यक्षही झाले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शपथपत्र अनिवार्य आहे,’ असे ते म्हणाले.

‘माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अफवा’ : विकास ठाकरे

पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी थेट विचारले की, ‘तुम्ही केव्हा भाजपमध्ये जाणार?’ यावर ठाकरे म्हणाले, ‘ही अफवा नवीन नाही. १९९७ पासून काही नेते आणि कार्यकर्ते अशा वावड्या पसरवत आहेत. मी काँग्रेसमध्ये जन्माला आलो, वाढलो आणि काम करतो आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’

या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या उमेदवार निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेची, पक्षनिष्ठेची आणि संघटन बांधणीच्या धोरणाची झलक मिळाली. तसेच, ठाकरे यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता आणि विश्वास निर्माण झाला आहे.