गडचिरोली : भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मतदानाचा समान अधिकार दिला असला तरी, सत्ताधारी भाजप सरकार निवडणूक आयोगाचा गैरवापर करून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ करीत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. मतदार यादीतील त्रुटीवर आक्षेप घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
अलीकडेच काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील मतदार यादीतील बनावट नावे आणि अनियमिततेचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर काँग्रेसकडून विविध जिल्ह्यांत झालेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर दुबार नावे, अस्तित्वात असलेल्या मतदारांची नावे वगळणे, तसेच मृत मतदारांची नावे कायम ठेवणे अशा गंभीर त्रुट्या उघडकीस आल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मतदार यादीतही अशाच प्रकारचा घोळ झाल्याचे निदर्शनास आल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसने लवकरच सत्य बाहेर आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदार यादीची छाननी करून त्रुटींची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर या संदर्भात निवडणूक आयोगाकडे अधिकृत आक्षेप नोंदविण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकशाही टिकविण्यासाठी मतदार यादीतील प्रत्येक त्रुटी उघडकीस आणून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा काँग्रेसतर्फे येत्या काही दिवसांत जिल्हाभर मतदार तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तसेच तालुकाध्यक्ष वसंत (गडचिरोली), मिलिंद खोब्रागडे (आरमोरी), प्रमोद भगत (चामोर्शी), राजेंद्र बुल्ले (वडसा) यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.