अमरावती: शहरातील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या (सुपरस्पेशालिटी) दुरवस्थेविरोधात काँग्रेसने शनिवारी तीव्र आंदोलन केले.गेल्या वर्षभरापासून डॉक्टरांचे मानधन थकवल्याने रुग्णालयातील महत्त्वाचे विभाग ठप्प झाले आहेत, ज्यामुळे हजारो गरीब रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोप करत काँग्रेसने महायुती सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभाराचा निषेध केला. या आंदोलनामुळे रुग्णालय परिसर सरकारविरोधी घोषणांनी दणाणून गेला होता.

माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस सरकारच्या काळात उभारलेले अमरावती सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरले होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे हजारो रुग्णांना येथे जीवदान मिळाले. मात्र, सध्याच्या महायुती सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे रुग्णालय पूर्णपणे ठप्प झाले आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

गेल्या २५ दिवसांपासून रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत, कारण त्यांचे गेल्या दीड वर्षांपासूनचे मानधन थकले आहे. यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलिसिस, हृदयरोग आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रियांसह सर्व अत्यावश्यक सेवा बंद आहेत. अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रतीक्षायादीत आहेत. उपचाराअभावी त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. काही रुग्णांनी जीव गमावल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसने केला.

महायुती सरकार एका बाजूला अनावश्यक खर्च आणि जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळत असताना, दुसऱ्या बाजूला गरीब जनतेला मूलभूत वैद्यकीय सुविधांपासून वंचित ठेवत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने रुग्णांमध्ये तीव्र संताप आहे. महायुती सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला.

या आंदोलनादरम्यान, अनेक रुग्णांनी स्वतः पुढे येऊन आपल्या व्यथा मांडल्या. कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या तपासण्या आणि शस्त्रक्रिया थांबल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसने यावेळी दिला.

सरकार निगरगट्ट

राज्यातील महायुती सरकार निगरगट्ट आणि असंवेदनशील आहे. केवळ कमिशनच्या टक्केवारीत सत्ताधारी गुंतलेले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी त्यांना काहीही सोयरेसुतक नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचेही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सरकारने तत्काळ डॉक्टरांचे थकित मानधन देण्याची व्यवस्था करावी.-डॉ. सुनील देशमुख, माजी पालकमंत्री.