देवेश गोंडाणे

नागपूर : अनेक वर्षांपासून शासकीय पदभरती होत नसल्याने लाखो तरुण बेरोजगारीच्या झळा सोसत आहेत. त्यात राज्य शासनाने थेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या कक्षा आणखी रुंदावल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. यामुळे  राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या शासन निर्णयाची होळी करण्याचे आवाहन केले आहे. 

 शासकीय कायमस्वरूपी नोकरीच्या आशेने राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना राज्य शासनाने विकासकामांना पुरेसा निधी मिळावा व प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत १३८ पदांच्या भरतीसाठी नऊ बाह्य सेवापुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यापूर्वी सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. पण, सहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत होते. दोन कंपन्यांना हे काम देण्यात आले होते.

हेही वाचा >>> Maratha reservation: जरांगेंचे उपोषण सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा

शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ पदांचा यामध्ये समावेश होता. आता मात्र याची व्यापकता वाढवली आहे. यामध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. प्रत्येक पदाचे वेतनही निश्चित करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून शासकीय पदभरती होत नसल्याने लाखो विद्यार्थी आधीच बेरोजगारीच्या झळा सोसत असताना अधिकारी आणि कर्मचारी पदांसाठी आता बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेतले जाणार असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध शहरांमध्ये भारत जोडो अभियान, स्टुडंट राईट्स असोसिएशन, ओबीसी विचार मंच अशा विविध संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे.  विरोधी पक्षानेही या विषयावरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

आरक्षणाला कात्री ..

खासगीकरणाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. कोणतेही आरक्षण यासाठी लागू होणार नाही. त्यामुळे राज्यात आरक्षणाची लढाई जोर धरली असताना कंत्राटी भरतीमुळे आरक्षणच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याच्या निर्णय घेऊन राज्य शासनाने लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची होळी केली आहे. यामध्ये निवडण्यात आलेल्या नऊ कंपन्या या भ्रष्टाचार करण्यासाठीच तयार करण्यात आल्या आहेत. योग्यवेळी त्याचा खुलासा करणार आहे. शासनाच्या या निर्णयाची विद्यार्थ्यांनी प्रत्येक राज्यात होळी करावी. – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते