Trainee IAS Pooja Khedkar अकोला : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होत आहे. पूजा खेडकर यांची वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूने सोमवारी रात्री चौकशी केल्याची माहिती आहे. रात्री उशिरा तब्बल तीन तास त्यांच्यात बंद द्वार चर्चा सुरू होती. नेमक्या कुठल्या प्रकरणात पूजा खेडकर यांची चौकशी करण्यात आली किंवा पूजा खेडकर यांची काही तक्रार आहे का? यासंदर्भात खुलासा होऊ शकला नाही. अतिशय गोपनीय पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक वादग्रस्त प्रकार समोर येत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कामकाजादरम्यान सुसज्ज स्वतंत्र कक्षाची मागणी, कक्ष उपलब्ध न झाल्याने त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या ‘अँटी चेंबर’चा ताबा, आलिशान वाहनावर लाल आणि निळा दिवा लावून फिरणे आदी अनेक कारणांनी त्या चर्चेत आल्या. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवल्यावर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली केली. त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा…अतिवृष्टीचे तांडव! खामगावात ८३८ हेक्टर जमीन खरडली,२४२ कुटुंब बाधित…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा खेडकर वाशिम येथे कार्यरत असून दररोज नवनवीन वाद समोर येत आहेत. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्याकडून वाशिम पोलिसांनी परवानगी घेत पूजा खेडकर यांची सोमवारी रात्री उशिरा चौकशी केली. चौकशीनंतर वाशिम पोलिसांची चमू माध्यमांशी न बोलता निघून गेली. त्यामुळे ही चौकशी नेमकी कशासंदर्भात होती, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक जिल्हा रुग्णालयात प्रयत्न केले. त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याकडे ४० कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या आई मनोरमा खेडकर या माजी सरपंच राहिल्या आहेत. असे असताना त्यांनी नॉन क्रिमीलेअरचा लाभ घेतला, असा आरोप आहे. यावरूनही त्यांची चौकशी होणार आहे. पूजा खेडकर यांची आई फरार आहे. त्यांच्याविरोधात शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पूजा खेडकर यांनी नावात बदल करून यूपीएससीचे प्रयत्न संपून देखील दोनवेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.