चंद्रपूर : भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिवंगत मातोश्री गंगुबाई जोरगेवार ऊर्फ अम्मा यांच्या नावाने गांधी चौकालगतच उभारण्यात येत असलेल्या अम्मा चौक व स्मारकावरून चंद्रपुरात नव्या वादाला तोंड फुटले. काँग्रेस, आप या पक्षांसह अनेकांनी या चाैकाला विरोध दर्शवला, तर पदपथ असोसिएशनने चौक तेथेच उभारण्याची मागणी केली. आता गोवा मुक्ती आंदोलनातील शहीद कॉ. बाबुराव थोरात यांच्या मुलाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून, आमदार-खासदार यांच्या आई-वडिलांच्या नावे चौक, स्मारक उभारणे योग्य आहे का? असा प्रश्न केला.
स्वातंत्र्यासाठी चंद्रपुरातील अनेक वीरांनी योगदान दिले. गोवा मुक्ती आंदोलनात बाबुराव थोरात शहीद झाले. या स्वातंत्र्यवीरांचे किंवा शहिदांचे शहरात कुठेही नाव दिसत नाही. वारंवार मागणी करूनही उद्यान, शाळा, रस्ते किंवा चौकाला स्वातंत्र्यवीरांचे, शहिदांचे नाव देण्यात आले नाही. परंतु चौकाला आमदारांच्या आईचे नाव दिले जात आहे, त्यांचा पुतळा बसवण्यात येत आहे. हा शहीद व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान नाही का? असा प्रश्न विजय थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
३ ऑगस्ट १९५५ रोजी गोवा मुक्ती आंदोलनात बाबुराव थोरात शहीद झाले होते. रविवारी चंद्रपुरातील आझाद उद्यानात बाबुराव थोरात यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व स्मृतींना उजाळा देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महायुती सरकारला स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचा, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा विसर पडला, असा आरोप या कार्यक्रमात करण्यात आला.