गोंदिया : गोंदिया विधानसभेचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपाला ‘रामराम’ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे रविवार, ८ सप्टेंबर रोजी पत्रपरिषदेत जाहीर केले. मात्र, त्यांच्या काँग्रेसप्रवेशापूर्वीच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.

गोपालदास अग्रवाल यांनी तब्बल २५ वर्षे जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व केले. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला होता. २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विनोद अग्रवाल भाजपमध्ये दाखल झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनाच भाजपाकडून उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित असल्यामुळे गोपालदास अग्रवाल यांची गोची झाली होती.

हे ही वाचा…अकोल्यातील श्री बाराभाई गणपतीची १३४ हून अधिक वर्षांची परंपरा

नेमके कारण काय?

गोपालदास अग्रवाल गोंदियातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यासाठीच त्यांनी भाजपा सोडून काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून गोंदिया विधानसभा मतदारसंघात झालेल्या ११ विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. केवळ दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय मिळविला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना स्वतंत्र लढले असता त्या निवडणुकीत शिवसेनेची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ १० हजार मते मिळाली होती आणि आता तर शिवसेनेचे विभाजन झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच मोठा पक्ष आहे, असे गोपालदास अग्रवाल म्हणाले होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उबाठा) गोंदिया जिल्ह्यात खूपच कमकुवत असल्याचे सांगत, हा मतदारसंघ काँग्रेसच्याच वाट्याला येईल, असेही त्यांनी ठासून सांगितले.

हे ही वाचा…वर्धा : ‘ बोला, दूध हवे की दारू ‘ शक्कल लढविणाऱ्यास अद्दल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटाची अधिकृत भूमिका काय?

गोंदिया विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उबाठानेही दावा केला आहे. गोपालदास अग्रवाल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत ही जागा शिवसेना सोडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत येथे काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ ९५०० मते मिळाली होती. शिवसेना (उबाठा)चे संघटन मजबूत असून आम्ही ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे युवासेना जिल्हाप्रमुख हरीष तुळसकर यांनी स्पष्ट केले. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस-शिवसेनेत जुंपणार?

गोपालदास अग्रवाल यांचे वक्तव्य आणि त्यावर शिवसेना उबाठाची प्रतिक्रिया, यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट होते. आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस-ठाकरे गटात चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहे. गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर जिल्ह्यात याचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.