नागपूर : लोकसभा निवडणुकीतील एकाकी ठरल्याने झालेली भाजपची पिछेहाट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बळावर विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश या पार्श्वभूमीवर संघाने आता भाजपला प्रत्येक निवडणुकीत मदत करण्याचे ठरवले आहे. त्यातून रविवारी नागपुरातील रेशीमबाग परिसरामधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भाजप कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक झाली.

या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी ९० दिवसांत प्रत्यक्ष गृहभेटीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. संघाच्या विविध संघटना आणि भाजप समन्वयाने हे काम करणार असल्याची माहिती आहे.

संघ परिवारातील सर्व संघटनांची विशिष्ट कालावधीनंतर बैठक होत असते. त्याच मालिकेत रविवारी झालेली भाजपची बैठक विदर्भ प्रांतस्तरीय असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते.

या बैठकीत राजू तोडसाम, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय कुटे, किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार, आमदार समीर कुणावार, डॉ. नरोटी, मंत्री अशोक उईके, सुमित वानखेडे, मंत्री आकाश फुंडकर, माजी खासदार हंसराज अहिर, आमदार आशीष देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दीपक तामशेट्टीवर, राम हरकरे, अतुल मोघे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आगामी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी सुमारे तीन महिन्यांचा अवधी मिळाला आहे. या काळात घरोघरी संपर्क करून पक्षाच्या कार्याचा प्रसार-प्रचार करण्याचे लक्ष्य कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. या बैठकीत संघाने गेल्या पाच वर्षात केलेले सूक्ष्म निरीक्षण आणि त्यानुषंगाने केलेल्या नियोजनावर प्रकाश टाकण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. एकीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘काय करायचे’ याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर दुसरीकडे संघाकडून आगामी नियोजन ‘कसे करायचे’? यासंदर्भात मार्गदर्शन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप कार्यकर्त्यांच्या अपूर्ण कामांवरून कानपिचक्या

राज्य शासनाने १० जून रोजी रात्री उशिरा महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभागरचना करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या समन्वय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या अपूर्ण कामांवरून कानपिचक्या देण्यात आल्या. गडकरी आणि फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना त्रुटी व उणिवांची जाणीव करून देण्यात आली.