खाटा, मनुष्यबळ समस्या नियंत्रणात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : कोरोना रुग्णांवरील उपचारात येणाऱ्या अडचणी संपल्या, खाटांची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता, औषधांचा साठा, समर्पित कोविड रुग्णालयांची संख्या वाढ आणि यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता या सर्व पातळीवर तूर्तास मात के ल्याचा दावा, पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला.

जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद यामध्ये यापुढेही उत्तम समन्वय ठेवून करोना नियंत्रित ठेवण्याचे निर्देश  राऊत यांनी सोमवारी व्हीसीद्वारे दिले. राऊत सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी आज मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. बैठकीला नागपूर येथून विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्यासह महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकार यांच्यासह विभाग प्रमुख सहभागी झाले होते.

आजच्या आढावा बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्यातील व शहरातील करोना बाधित बरे होण्याचा दरात लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णांसाठी शहरांमध्ये खाटांची संख्या कमी असल्याची मधल्या काळात ओरड होती. महापालिकेने मोठय़ा प्रमाणात खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेतले असून आता मोठय़ा प्रमाणात बेड उपलब्ध झाले आहेत. खाटांच्या उपलब्धतेसंदर्भातील माहिती आता सहज डॅश बोर्डवर मिळत आहेत. मेयो आणि मेडिकल या ठिकाणी खाटांचे व्यवस्थापन व अन्य प्रशासन सांभाळण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीनंतर या समस्येवर मात करण्यात यश आले आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात महापालिकेने ताब्यात घेतलेल्या खाजगी हॉस्पिटलच्या अवास्तव बिल आकारणीवर देखील नियंत्रण आले आहे. या कामी महापालिकेने करोना मित्रांची नियुक्ती केली आहे. आढावा बैठकीत गेल्या सात दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे यासंदर्भात नोडल अधिकारी असून ऑक्सिजनची उपलब्धता कायम राहील यासाठीची समिती दररोज आढावा घेत आहे.

सध्या ३५६ व्हेंटिलेटरची उपलब्धता जिल्ह्यात आहे. मात्र भविष्यातील कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता शासकीय व खाजगी रुग्णालयातील ही सुविधा वाढवण्याचे निर्देश आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले असून यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona patients will be treated faster guardian minister nitin raut zws
First published on: 22-09-2020 at 00:27 IST