नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांना धमकावणारा तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी तेलंगणा राज्यातून बेड्या ठोकल्या. त्याला मंगळवारी दुपारी कोल्हापूर न्यायालयात हजर केले.तेथे शिवप्रेमींनी मोेठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

कोल्हापूर न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्रशांत कोरटकर याच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असून त्याच्या चौकशीसाठी सात दिवसांची कोठडी हवी असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्या. एस.एस. तट यांनी हा निर्णय दिला.

प्रशांत कोरटकर हा तब्बल गेल्या महिनाभरापासून फरार होता. कोल्हापूर पोलीस कोरटकरचा कसून शोध घेत होती. कोरटकर याची पोलीस कोठडी मिळाल्यामुळे चौकशीत तो काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अन् अनर्थ टळला

प्रशांत कोरटकर याला पोलीस ठाण्यातून न्यायालयात नेताना आणि परत आणताना कोल्हापुरातील शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजक टिप्पणी करणाऱ्या कोरटकरला कोल्हापुरी चपलेने बदडण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या परिसरात पोलीस अधीक्षकांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे आंदोलकांना प्रशांत कोरटकरपर्यंत पोहोचता आले नाही. प्रशांत कोरटकर याला सुनावणी झाल्यानंतर न्यायालयातून बाहेर आणत असताना एका व्यक्तीने त्याच्यावर चप्पल भिरकावली. मात्र, पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे नेमके प्रकरण

कोल्हापुरातील रहिवाशी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.