गडचिरोली: अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजलेल्या धान भरडाई घोटाळ्यातील आरोपी भास्कर डांगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून डांगे फरार आहेत.
आरमोरी येथील जनता राईस मिलवर निकृष्ट दर्जाचा (बीआरएल) तांदूळ शासनाच्या गोदामात पाठवून ७ लाख ८५ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली, असा आरोप आहे. यावरुन गिरणीमालकावर २ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देसाईगंज ठाण्यात अजय राईस मिलचे मालक भास्कर किसन डांगे ,सोनल पोहा उद्योग मिलच्या मालक माया प्रभाकर डांगे व शारदा स्टिम प्रोडक्ट, कुरूड या संस्थेचे मालक राजकुमार अर्जुनदास मोटवाणी यांच्यावर गुन्हा नोंद झाला.
दरम्यान, आरमोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवतेंकडे आहे, तर देसाईगंज येथील तीन गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. पो.नि अजय जगताप यांच्याकडून तपास काढून घेत उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्याकडे सोपविला आहे.
भोसले यांनी भरडाई केंद्राची झाडाझडती घेतली असून आवश्यक ती माहिती आदिवासी विकास विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांसह जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडून मागवली होती. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडली.
आरोप गंभीर – न्यायालय
यातील भास्कर डांगे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीनासाठी धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीनंतर २३ रोजी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. यावेळी न्यायालयाने याप्रकरणी दाखल गुन्हा गंभीर असून त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर पडतो आहे. असे ताशेरे ओढले. दरम्यान माया डांगे यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.