नागपूर : गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीनंतर शहराच्या संवेदनशील भागांतील संचारबंदी रविवारी पूर्णत: मागे घेण्यात आली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांनी दुपारी याबाबतचा आदेश जारी केला. त्यामुळे सहा दिवसांच्या तणावानंतर शहराने मोकळा श्वास घेतला आहे.

१७ मार्चच्या रात्री शहरातील महाल परिसरात दंगल झाली होती. त्यानंतर कोतवाली, तहसील, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा, यशोधरानगर, नंदनवन आणि कपिलनगर या ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू झाली. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन लवकरच संचारबंदी हटवण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी याबाबत निर्णय घेण्यात आला. गुरुवारी नंदनवन आणि कपिलनगर हद्दीतील संचारबंदी मागे घेण्यात आली तसेच पाच ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदीत दोन तासांची सवलत देण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. शनिवारी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, आणि इमामवाडा या पाच ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णपणे हटविण्यात आली, तर कोतवाली, तहसील, गणेशपेठ या तीन ठाण्यांच्या हद्दीत केवळ तीन ते सात या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. यशोधरानगरात संचारबंदी कायम होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यापारी, नागरिकांना दिलासा

रमजान ईद आणि गुढीपाडवा हे सण जवळ आले असताना संचारबंदीमुळे व्यापार ठप्प होता. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन संचारबंदी मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार रविवारी संचारबंदी संपूर्णत: उठवण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्याबरोबरच जनजीवन सुरळीत झाल्याने नागपूरकरांनाही दिलासा मिळाला आहे.