भंडारा: भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील मांगली/किटाडी येथे बौद्धविहाराच्या जागेत सुशोभिकरण करताना काही नागरिकांनी कामात अडथळा आणल्याने गावात दलित सवर्ण वाद पेटला आहे. दलितांना सवर्णांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करीत ४० जणांविरोधात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी सांगितले.
बौद्ध विहारासमोरील सौंदर्यीकरणाचे काम सवर्णीयांनी उखडून फेकल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप निर्माण झाला असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दलित महिलांनी काही काळ पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता. सध्या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मांगली/किटाडी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बौद्धविहार सभागृह सौदर्यीकरणाचे काम ग्राम पंचायत यंत्रणेमार्फत सुरू होते.
हेही वाचा… नागपुरात ‘सीएनजी’चे दर सर्वाधिक; मुंबईत मात्र दर कपात… आजचे दर पहा…
दरम्यान, गावातील काही नागरिकांनी पूर्वसूचना न देता कामात अडथळा निर्माण केला. बौद्धविहाराच्या सौंदर्यीकरणाच्या कामाची नासधूस केल्याचा आरोप तक्रारकर्त्यानी केला आहे. हे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेल्यानंतर या प्रकरणात ७ जणांविरोधात ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.