बुलढाणा:  अमरनाथ येथे बाबा बर्फानीचे दर्शन घेतले, जातानाचा आणि परतीचा प्रवास सुखरूप झाला पण मलकापूर नजीक काळाने झडप घातली. काही समजायच्या आत होत्याचे नव्हते झाले. आज शनिवारी उत्तररात्री मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या एका प्रवाशाने अपघाताची हकीकत सांगितली.

ट्रॅव्हल्सच्या मागील बाजूस बसल्याने बचावल्याचा आनंद आहे पण अनेक दिवसांपासून सोबत प्रवास करणारे सहाजण अखेरच्या प्रवासाला निघून गेले. अश्या विचित्र मनोस्थितीत असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील जखमी व जबर मानसिक धक्का बसलेल्या प्रवाशाने कशीबशी अपघाताची माहिती दिली. खडतर समजल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरिता हिंगोली जिल्ह्यातील भाविकांनी ट्रॅव्हक्स ठरविली.

हेही वाचा >>> Buldhana Travels Accident: वारसांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हिंगोली ते अमरनाथ पर्यंतचा त्यांचा प्रवास सुखरूप झाला. अनेक अडचणींचा सामना करीत बाबा बर्फानीचे दर्शनही झाले. तीन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या प्रवासात अतिवृष्टीमुळे मुक्काम करीत इथपर्यंत पोहोचलो. साधारणतः तीन वाजताच्या आसपास मोठा आवाज झाल्यावर अपघात झाल्याचे समजले. अन् काही मिनिटातच होत्याचे नव्हते झाले, असे या प्रवाशाने सांगितले तेव्हा माध्यम प्रतिनिधींच्या डोळ्यांतूनही नकळत अश्रू ओघळले.