scorecardresearch

ताडोबात वाघाचा मृतदेह आढळला; अधिवास क्षेत्रावरून झुंज की..

दोन वाघांमध्ये अधिवास क्षेत्रावरून झालेल्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनखात्याचा आहे.

dead tiger Tadoba Andhari
ताडोबात वाघाचा मृतदेह आढळला; अधिवास क्षेत्रावरून झुंज की.. (प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र )

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी सायंकाळी पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांमध्ये अधिवास क्षेत्रावरून झालेल्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनखात्याचा आहे.

अवघ्या दोन महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात सहा वाघांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाचे पथक गस्त करीत असताना ताडोबा बफर क्षेत्रातील चक निंबाळा गावाजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला. मृत वाघाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हा वाघ आधीपासून जखमी असावा, असेही सांगण्यात येत आहे. चौकशीच्या औपचारिकतेनंतर वाघाचा मृतदेह चंद्रपूर येथील उपचार केंद्रात (टीटीसी) आणण्यात आला. सोमवारी सकाळी टीटीसीमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा – वर्धा : पंतप्रधानांच्या गतीशक्ती योजनेमुळे रुपडे पालटणार; ‘ही’ रेल्वे स्थानके होणार चकाचक

हेही वाचा – गोंदिया : वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी, जिवंत मोरासह विविध प्राण्यांचे अवयव जप्त; पाच आरोपींना अटक

चालू वर्षात जिल्ह्यात सहा वाघांचा मृत्यू झाला आहे. ३ जानेवारी रोजी ब्रम्हपुरी तालुक्यात एका शेतातील विहिरीत वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. ४ जानेवारीला सावली रेंजमधून सुटका करण्यात आलेल्या वाघिणीचा १४ जानेवारीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर शेतात विजेचा धक्का लागून वाघिणीचा मृत्यू झाला होता. १४ जानेवारीच्या रात्री भद्रावती रेंज अंतर्गत माजरी येथे, तर ५ फेब्रुवारी रोजी पोंभुर्णा रेंजमधील घोसरी बीट अंतर्गत शेतात एका वाघाचा मृत्यू झाला होता. यानंतर पूर्ण वाढ झालेल्या एका वाघाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. १२ फेब्रुवारी रोजी वरोरा रेंजच्या सीमेवरील पोथरा नदीत वाघाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला होता. दोन महिन्यांच्या कालावधीत सहा वाघांचा मृत्यू वन खात्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 12:46 IST
ताज्या बातम्या