नागपूर : जन्मापासून कानावर आवाजच पडलेला नसल्याने त्यांची वाचा हरवली. नावही सांगता येत नाही ना धड परिसराची ओळख. ना त्यांचा कोणाशी परिचय ना ते कोणाला ओळखायचे. खेळण्याच्या नादात घरापासून दूर गेल्याने विचित्र कोंडीत सापडलेल्या दोन मुकबधीर बहिणी-भाऊ एकमेकांचे बोट धरून कावऱ्या बावऱ्या नजरेने भरकटली आणि नवख्या शहरात हरवून बसली. मात्र दैव बलवत्तर होते म्हणून अवघ्या पाच तासांत त्यांचा शोध लागला. हे शक्य झाले वाठोडा पोलिसांनी दाखविलेली समयसुचकता आणि सांघिक कामगिरीमुळे. हरवलेल्या या चिमुकल्यांचा शोध लावत त्यांना त्यांना चुकीच्या हातात पडण्यापासून पोलिसांनी वाचविले. अंगावर शहरे आणणारा हा प्रसंग घडला वाठोडा परिसरातून हरवलेल्या अवघ्या ५ आणि ६ वर्षांच्या भाऊ- बहिणीसोबत.
बिहार राज्यातील रहिवासी असलेली ही भावंडं माता पित्यांसोबत १५ दिवसांपूर्वी नागपुरात आली होती. आराधना नगरातल्या परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. हरवलेली मुले बोलू शकत नसल्याने माता पित्यांनी आधी परिसर पिंजून काढला. मात्र सायंकाळी ५ वाजले तरी मुले सापडत नसल्याने त्यांनी वाठोडा पोलिसांकडे मदत मागितली.
घटनेचे गांभीर्य पाहून सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करत शोधमोहीम आखण्यात आली. पूर्ण परिसरात व्हॉट्सअॅप गटांद्वारे मुलांचे फोटो आणि वर्णन प्रसारित करण्यात आले. पीए सिस्टमद्वारे परिसरात लोकांना सुचना देण्यात आल्या.
ज्या परिसरातून ही मुले बेपत्ता झाली होती, तिथून एक किलोमीटर अंतरावर रेल्वे पुलाखाली पाण्याजवळ ही मुले खेळताना दिसल्याची माहिती एका महिलेने दिली. पोलिस तिथे पोहचले मात्र पायांच्या ठशांशिवाय मुले दिसत नव्हती. त्यामुळे ती पाण्यात तर बुडाली नाहीत, ना अशी भीती निर्माण झाल्याने तात्काळ पथकाला पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरिक गुडू शेवणे यांनी धाडस दाखवत पाण्यात उतरून तपास केला, पण मुले तिथे नव्हती.
रात्री अडिचच्या सुमारास छत्तरपूर फार्मच्या दिशेने मुले जाताना दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि नागरिकांनी उमिया परिसरात शोध घेतला. अखेर रेल्वे लाईनवर २ ते ३ किलोमीटर अंतरावर ही दोन्ही मुले चालताना दिसली. परिसर अपरिचित असल्याने ती रस्ता चुकली होती. मुले सापडताच पालकांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
या शोध मोहिमेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश बोराडे, उपनिरीक्षक माधव गुंडेकर, अमोल पाटील, अतुल पवार, कृष्णा साळुंखे, कैलास चकोले, सुनिल वानखेडे, जितेंद्र मनगटे, प्रफुल वाघमारे, मनोहर बागायतगर, महेंद्र लाडे, विशाल चहांदे, रामु चितरमारे यांच्यासह नागरिक सचिन ढोमणे, प्रज्वल वासनिक, संतोष रॉय, दिनेश कातुरे, कैलास टाले, सतिश बर्डे, महेश केशरवाणी अशिष मल्लेवार व अवंतीकाताई लेमुरवाळे यांनीही सहकार्य केले.