अकोला : काँग्रेसमधील वादाचे सत्र ‘संपता-संपेना’ असे चित्र असून खुर्चीवरून दोन प्रदेश पदाधिकारी आपसात भिडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी अकोल्यात घडला. प्रदेश कार्यकारिणीतील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यातून एकाने दुसऱ्याला बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पीकविम्याच्या प्रश्नावर काँग्रेसने आंदोलनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलाविली होती. त्यानंतर एकत्रित छायाचित्र काढत असताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील आणि प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्यात उभे राहण्याच्या कारणावरून वाद झाला. दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. डॉ. अभय पाटील हे सभागृहातून बाहेर त्यांच्या वाहनाकडे गेले. डॉ. अभय पाटील यांच्या मागेच मदन भरगड हे सुद्धा बाहेर आले. डॉ. पाटील यांनी बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप यावेळी भरगड यांनी केला. डॉ.पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

हेही वाचा >>> “वर्धा जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते चोवीस कॅरेट सोने”, सुधीर मुनगंटीवार यांचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित असतांना हा वाद झाला. डॉ. अभय पाटील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित एका बैठकीत मदन भरगड यांनी उमेदवारीवरून काही टिप्पणी केल्याची माहिती आहे. या वादाला त्याची किनार असल्याची चर्चा आहे. पॅराशूट लावून पक्षात आलेल्या नेत्‍यांना उमेदवारी कशी देणार, असा प्रश्न भरगड यांनी केला होता. दरम्यान, या वादावर जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी कानावर हात ठेवले.