नागपूर : महामार्गाचे काम अतिशय वेगाने करण्याचा कीर्तिमान असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उड्डाण पूल दुरुस्तीसाठी तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ लागत आहे. नागपूर ते चंद्रपूर, वर्धा आणि हैदराबादला जोडणाऱ्या या अत्यंत व्यस्त महामार्गावरील उड्डाण पूल बंद असल्याने वाहतूक कोंडी होत असून आता या उड्डाण पुलाची दुरुस्ती पूर्ण होऊन येत्या जुलैपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
नागपूर-हैदराबाद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाण पूल साडेतीन वर्षांत खचल्याने ‘एनएचएआय’वर टीका होत आहे. व्हीएनआयटीकडून तपासणीनंतर पुलाच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. परंतु, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. आधी हे काम ९ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आता हे काम पूर्ण करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या उड्डाण पुलावरून २४ डिसेंबर २०२४ पासून वाहतूक बंद आहे. व्हीएनआयटीकडून अहवाल आल्यानंतर ‘एनएचएआय’ने पुलाची बदलण्याचा आणि पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा खर्च कंत्राटदार कंपनी करत आहे. यासंदर्भात ‘एनएचएआय’चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, पूल पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. भार तपासताना आणि डागडुजी करताना काही अडचणी येतात. त्यामुळे कालावधी वाढवण्यात आला आहे. तरीपण एप्रिल अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करून मे महिन्यात पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न आहे.
पूल खाली सरकला
बुटीबोरी गाव आणि बुटीबोरी एमआयडीसीला जोडणाऱ्या चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर बुटीबोरी उड्डाण पूल आहे. या पुलाचे काम २०१८ मध्ये सुरू झाले आणि २०२१ मध्ये पूर्ण झाले. ‘एनएचएआय’च्या दाव्यानुसार या पुलावरून १८७ टन वजनाचा मालवाहक (ट्रेलर) गेल्यानंतर पुलाच्या ‘कॅन्टीलिव्हर’च्या पायाचे प्लास्टर निघाले. त्यामुळे पूल खाली सरकला आहे.
वर्धा, चंद्रपूरहून नागपूरकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल
वर्धा ते नागपूरकडे जाणारी वाहतूक ही वर्धा रोड-एसीसी चौक, अंडरपास, सर्व्हिस रोड, अग्निशमन केंद्र, इंडोरामा कंपनी, सलई ढाबा मार्गे आणि नंतर समृद्धी महामार्गावर वळवून राष्ट्रीय महामार्ग-४४ ला (नागपूरकडे) पुन्हा जोडण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, चंद्रपूर ते नागपूर जाणाऱ्या वाहतुकीला वाय पॉईन्ट डावीकडे वळून वर्धा रोड-एसीसी चौक, अंडरपास, सर्व्हिस रोड डावीकडे-अग्निशमन कार्यालय-इंडोरामा कंपनीकडे-उजवीकडे वळून सालईढाबा मार्गे समृद्धी मार्गाने नागपूरकडे जाईल.
गडकरींच्या काळात एवढा उशीर का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात रस्तेबांधणीला वेग आला. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. परंतु, आता त्यांच्या काळात आणि त्यांच्या जिल्ह्यातील एका उड्डाण पुलाची दुरुस्ती वेळेत पूर्ण होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.