नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विदर्भ दौरा आटोपताच नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.जुने निष्ठावंत कार्यकर्ते अनिल अहिरकर यांना शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. अजित पवार गेल्या आठवड्यात वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी नागपूर शहर पदाधिकाऱ्यांची बैठक  घेतली होती.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी सत्तेत असून सुद्धा कामे होत नाहीत,मंत्री येतात आणि जातात परंतु शहर राष्ट्रवादीला त्याचा थांग पत्ता लागत नाही अशी तक्रार अजित पवार यांच्यासमोर केली होती.त्यावेळी अजित पवार यांनी कामे कसे करून घ्यायचे ते शिकून घ्या असा सल्ला दिला होता.पवार यांनी स्थानिक पदाधिकारी आपल्या विजयगड बंगल्यावरील कार्यालयात कधीच लोकांची कामे घेऊन जात नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती. माझ्या किंवा पक्षाचा नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम केले तर त्याला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता.

पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे प्रशांत पवार यांच्या बाबत तक्रारी केल्या होत्या. निरीक्षक राजू जैन यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ते पुण्याला गेले आणि लगेच शहराध्यक्षपदावरून प्रशांत पवार यांची उचलबांगडी केली. नागपूर शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीच्या  बैठकीत अजित पवार यांनी येथील पदाधिकारी आणि संघटनेबद्दल व्यक्त केलेली नाराजी नंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील असे संकेत मिळाले होते त्याची प्रचिती काही दिवसातच आली. प्रशांत पवार यांच्यावर प्रदेश प्रवक्ते व प्रदेश महासचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेस मधून राष्ट्रवादीत गेलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांचीही प्रदेश सराचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.