अमरावती : दरवर्षी मातीच्या मूर्तीची स्थापना, दहा दिवसांचा थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव आणि चतुर्दशीला विसर्जन ही गणेशोत्सवाची सर्वसाधारण पद्धत.पण अमरावतीतील तारखेडा भागात असलेल्या पाटलाच्या वाड्यातील देशमुख कुटुंब गेल्या ३७५ वर्षांपासून एक आगळीवेगळी परंपरा जपत आहे. येथे दरवर्षी मातीची मूर्ती तयार केली जाते. गणेश चतुर्थीला तिची स्थापना होते, आणि पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापर्यंत ही मूर्ती वर्षभर मंदिरात पूजेसाठी ठेवली जाते. त्यानंतर, गणेश चतुर्दशीला तिचा विसर्जन समारंभ पार पडतो. यावर्षी तयार होणारी मूर्ती पुढील वर्षभर मंदिरात विराजमान राहणार आहे.

मंदिरातील गणपतीच्या स्थापनेची कहाणी

सन १६४० ते १६४५ दरम्यान गुजरातहून एक संत मुनी महाराज तारखेडा परिसरात आले होते. त्यावेळी देशमुख आणि पाटील अशा दोन्ही पदव्या धारण करणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या पाटलाच्या वाड्यात ते नेहमी येत असत आणि हळूहळू त्यांनी तिथेच वास्तव्य केले. याच काळात, त्यांनी कुटुंबाला गणेश चतुर्थीला मातीचा गणपती बनवून त्याची स्थापना करायला सांगितले आणि चतुर्दशीला त्याच ठिकाणी त्याचे विसर्जन करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, त्यांनी स्पष्ट केले की ही मूर्ती कुटुंबातील सदस्यानेच तयार करायला हवी.

या परंपरेची सुरुवात १६५० मध्ये झाली, जेव्हा विक्रम देशमुख यांनी मातीची पहिली मूर्ती घडवली. तेव्हापासून देशमुख कुटुंब ही परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे नेत आहे, सध्या श्याम देशमुख हे मूर्तिकाम सांभाळत आहेत.

पूर्वी लहान, आता पाच फुटांची मूर्ती

सुरुवातीच्या काळात गणपतीची मूर्ती खूप लहान आकाराची असायची. १८५० नंतर, हरिश्चंद्र पाटील यांनी पहिल्यांदाच पाच फुटांची मूर्ती तयार केली. या मोठ्या मूर्तीमुळे अमरावती शहरात या गणपतीची सर्वत्र चर्चा झाली आणि हा ‘हरिश्चंद्र पाटलांचा गणपती’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

खासगी मंदिर, सार्वजनिक उत्सव

पाटलाच्या वाड्यातील गणपती मंदिर देशमुख कुटुंबाचे खासगी असले, तरी ते सर्व भाविकांसाठी खुले असते. गणेशोत्सवाच्या काळात येथे मोठा महाप्रसाद असतो, दररोज रात्री भजन होते आणि परिसरातील सर्व लोक या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे, हे मंदिर खासगी असले तरी इथला दहा दिवसांचा गणेशोत्सव पूर्णपणे सार्वजनिक स्वरूपाचा असतो.

परंपरेनुसार होणारे विसर्जन

पूर्वी या मूर्तींचे विसर्जन मंदिराच्या आवारातच होत असे. उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आल्यावर, श्रीअंबादेवी आणि श्रीएकविरा देवी मंदिराला लागून असलेल्या तुळजागीर वाड्यातील विहिरीत गणपतीचे विसर्जन केले जाऊ लागले. वाजतगाजत आणि थाटामाटात निघणाऱ्या मिरवणुकीत या गणपतीला मानाचे स्थान दिले जाते.