अमरावती : चिखलदरा येथील स्‍कायवॉकचे काम पूर्ण होत आले आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी सोबतच केबल कारची देखील मागणी केली आहे. या दोन गोष्‍टी जर एकत्र असतील, तर पर्यटकांचा ओघ मेळघाटात वाढणार आहे. याचा प्रस्‍ताव तयार करा, ते पूर्ण करण्‍याची जबाबदारी मी स्‍वीकारतो. २०१४ ते २०१९ पर्यंत मी मुख्‍यमंत्री असताना मेळघाटात मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेण्‍यात आली, पण राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार आल्‍यानंतर ही सर्व कामे थां‍बविण्‍यात आली. अडीच वर्षे चिखलदरा येथील स्‍कायवॉकचे काम थांबविण्‍याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले, असा आरोप उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारणी येथे बोलताना केला.

मेळघाटचे भाजपचे उमेदवार केवलराम काळे यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला खासदार नवनीत राणा, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, रमेश मावस्‍कर आदी उपस्थित होते.

हेही वाचा – महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका

देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, महाविकास आघाडी सरकारने विकास कामांमध्‍ये अडथळे आणण्‍याचे काम केले. स्‍कायवॉकचे थांबलेले काम आमच्‍या सरकारने सुरू केले आणि ते आता पूर्णत्‍वास देखील आले आहे. आमच्‍या सरकारने आदिवासींसाठी बिरसा मुंडा योजना आणली आणि चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला. मेळघाटात रस्‍ते, वीज, पाणी आणि घरे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी विविध योजना राबविण्‍यात येत आहेत.

सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी देणार आहे, पण तो जनतेपर्यंत पोहचायला हवा. कमिशनखोर आमदार असेल, तर लोकांपर्यंत विकास पोहचू शकणार नाही, त्‍यामुळे भाजपचाच आमदार निवडून द्यावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हेही वाचा – “काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

वनविभागाच्‍या कार्यपद्धतीवर टीका

वनविभागाचे काही अधिकारी हे आदिवासींना त्रास देण्‍याचे काम करीत आहेत. काही चांगले कर्मचारी देखील आहेत. त्‍यांना त्‍यांचे काम करायचे आहे. यापुढे कोणत्‍याही गोपालक आदिवासींना त्‍यांच्‍या गायींच्‍या चराईसाठी त्रास होणार नाही, याचा बंदोबस्‍त केला जाईल, असे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मेळघाटात गवळी बांधवांसाठी बचत गटाच्‍या माध्‍यमातून सहकारी तत्‍वावर दूध प्रक्रिया उद्योग स्‍थापन करण्‍याची सूचना फडणवीस यांनी नवनीत राणा यांना केली. या उद्योगासाठी १०० टक्‍के अनुदान देण्‍याचे आश्‍वासन देखील त्‍यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्‍ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोक हे विकास विरोधी आहेत. या सावत्र भावांनी लाडकी बहीण योजनेत अडथळे आणण्‍याचा प्रयत्‍न केला, पण न्‍यायालयाने देखील ही योजना बंद करू दिली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.