नागपूर : गरीब, श्रीमंत अशी दरी दूर सारून साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी. पाहता पाहता दिवाळीला सुरुवात देखील झाली आहे. नरकचतुर्दशीनंतर येणाऱ्या लक्ष्मीपूजनाबाबत मात्र यंदा अनेकांच्या मनात संभ्रम आहे. लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचे यावरून ज्योतिषी, पुजारी यांच्यातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. दिव्यांची लख्ख रोषणाई, पारंपरिक फराळाची मजा आणि एकूणच प्रफुल्लित, आनंदाचे वातावरण यामुळे सगळेजण वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहतात. जात, धर्माचे बंधन सोडून हा सण सर्वच धर्मीय लोक साजरा करतात.
दिवाळीत लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडवा हे दिवस अतिशय महत्वाचे मानले जातात. हिंदू पंचांगानुसार दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. यंदा म्हणजेच २०२५ च्या दिवाळीत हे सण नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत आणि यंदाची दिवाळी कधी आहे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. याविषयी जाणून घेऊयात. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस आणि या दिवशी मुख्यतः खरेदी करणे आणि लक्ष्मी-कुबेर पूजेला विशेष महत्त्व आहे.
घरात सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास संपत्ती आणि समृद्धी वाढते असे वर्षानुवर्षे पासून मानले जाते. यावर्षी खरेदीसाठी शुभ वेळ दुपारी १२.१८ पासून १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ०१.५१ पर्यंतचा वेळ होती. काहींनी हा मुहुर्त साधून खरेदी केली तर काहींनी त्यांच्या वेळेच्या सोयीनुसार खरेदी केली. नरक चतुर्दशी हा दिवाळीचा दुसरा दिवस आणि या दिवसाचे महत्त्व म्हणजे, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला, अशी आख्यायिका आहे. याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. मात्र, अनेकांनी पहाटेची वेळ पाळली तर काहींना ही वेळ पाळणे जमले नाही, तरीही त्यांनी हा सण साजरा केला.
दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यंदा कार्तिक अमावस्या २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४४ वाजता सुरू होऊन २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५४ वाजेपर्यंत चालणार आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ७.०८ ते ८.१८ पर्यंत आहे. त्यामुळे दिवाळीचा मुख्य सण २० ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. काही जण मात्र दिनदर्शिकेनुसारच लक्ष्मीपूजन करणार आहेत. कालनिर्णय या दिनदर्शिकेत २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन दिलेले आहे. दिवाळी पाडवा नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो.
या दिवशी राजा बलि यांची पूजा करून पाडवा साजरा केला जातो. नवविवाहित वधु-वरांसाठी हा दिवस फार खास मानला जातो. दिवाळीचा शेवटचा आणि भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच भाऊबीजेचा सण साजरा करतात. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. यावर्षी गुरुवारी भाऊबीज साजरी केली जाणार आहे.