गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आमच्या सरकारने ‘एनडीआरएफ’ निकषांच्या पुढे जाऊन मदत देण्याचे जाहीर केले आहे. पावसाळी अधिवशेन संपताच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर येथे दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या क्रांतीभूमीत आयोजित शहीद स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही, आता तेच लोक आम्हाला शहाणपणा सांगत आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी पावसाळी अधिवशेन संपताच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला ७०० रुपये बोनस जाहीर करण्याचा विषय शासनाच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

चिमूरच्या इतिहासावर लघुचित्रपट तयार करा
चिमूर क्रांतीचा इतिहास, शहिदांचे बलिदान, स्वातंत्र्यविरांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चिमूरच्या इतिहासावर लघुचित्रपट तयार झाला पाहिजे. यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.