नागपूर : राज्य पोलीस दलाच्या प्रमुख पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या गुरुवारी दुपारी अचानक संघ महाल येथील संघ मुख्यालयात पोहचल्या. त्यांनी जवळपास अर्धा तास तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस महासंचालकांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, हे विशेष.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यानंतर नागपुरात पोहचल्या. पोलीस मुख्यालयाच्या शिवाजी मैदानावर सुरु असलेल्या पोलीस क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. गुरुवारी दुपारी दोन वाजता अचानक त्यांनी महालमधील संघ मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे नियोजन केले. याबाबत पोलीस विभागाने कमालीची गुप्तता पाळली.

हेही वाचा…नागपूर : विद्यापीठाच्या मैदानावर भाजप अध्यक्ष नड्डा यांचे भाषण; विद्यार्थी संघटना आक्रमक, काय आहे प्रकरण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्ला दुपारी दोन वाजता थेट संघ मुख्यालयात पोहचल्या. त्यांनी सुरुवातीला संघ मुख्यालयाच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही यंत्रणादेखील तपासली. संघ मुख्यालयात रश्मी शुक्ला जवळपास अर्धातास उपस्थित होत्या. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत काही निर्देश दिलेत. यांनी परिमंडळ ३ मध्ये उपायुक्त म्हणून काम केले आहे. यामुळे त्यांच्याकडे संघ मुख्यालयाची माहिती अगोदरपासूनच आहे हे विशेष. महासंचालक रश्मी शुक्ला या संघ मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी पाहणी केल्यानंतर त्या परत गेल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली.