Premium

गडचिरोली: झेंडेपार येथील प्रस्तावित खाणींवरून आदिवासींमध्ये खदखद; ९० ग्रामसभांचा विरोधी सूर

जिल्ह्यातील दक्षिणेत सूरजागड टेकडीवर यशस्वीरीत्या लोहखनिज उत्खनन सुरू केल्यानंतर प्रशासन उत्तर भागात कोरची तालुक्यातील झेंडेपार टेकडीवर लोहखान सुरू करतील या भीतीने तेथील आदिवासींमध्ये खदखद आहे.

zhendepar
झेंडेपार येथील प्रस्तावित खाणींवरून आदिवासींमध्ये खदखद

सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील दक्षिणेत सूरजागड टेकडीवर यशस्वीरीत्या लोहखनिज उत्खनन सुरू केल्यानंतर प्रशासन उत्तर भागात कोरची तालुक्यातील झेंडेपार टेकडीवर लोहखान सुरू करतील या भीतीने तेथील आदिवासींमध्ये खदखद आहे. शुक्रवारी पार पडलेल्या राव पाट गंगाराम यात्रेत ९० ग्रामसभांनी यावर चिंता व्यक्त करीत विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा >>>अ. भा. मराठी साहित्य संमेलन: शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५ खाणी प्रस्तावित आहे. त्यापैकी १३ खाणी दक्षिण तर १२ उत्तर गडचिरोलीच्या आदिवासी बहुल भागातील आहेत. ग्रामसभा व स्थानिक आदिवासींच्या विरोधानंतर देखील दक्षिणेतील एटापल्ली तालुक्यात सूरजागड टेकडीवर मागील दीड वर्षांपासून लोहखनिज उत्खनन सुरू आहे. या यशस्वी प्रयोगानंतर आता उर्वरित खाणी चालू करण्याबाबत काही कंपन्या उत्सुक असून त्यांनी त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आदिवासींमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. येथील झेंडेपार गावनजिक असलेल्या टेकडीवर लोह खनिजाचे साठे आहेत. येथे उत्खनन २०१७ मध्ये एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे उत्खनन चालू होऊ शकले नाही. २०११ मध्ये देखील खाणीच्या विरोधात या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मोर्चा काढला होता. परंतु सूरजागडच्या यशस्वी प्रयोगानंतर आता प्रशासन झेंडेपारमध्ये सुध्दा टप्प्याटप्प्याने उत्खनन सुरू करेल, अशी भीती येथील आदिवासींच्या मनात आहे. या टेकडीवर आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या’राव गंगाराम पाट’ यात्रेत ही खदखद बाहेर आली.

हेही वाचा >>>वर्धा: संमेलनाध्यक्षनाच मंचावर पोलिसांची आडकाठी ! कन्या भक्ती चपळगावकर यांची जाहीर नाराजी

यावेळी तालुक्यातील २ इलख्यातून आलेल्या ९० ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी एक बैठक घेत खाणविरोधी भूमिका मांडली. यामुळे आदिवासींनी जपून ठेवले पारंपरिक जंगल, गौण वनउपज नष्ट होतील. सोबतच आदिवासींचे देव देखील संकटात येतील. अशी भीती यावेळी व्यक्त केल्यात आली. सरकार ज्या विकासाची आणि रोजगाराची भाषा करीत आहे, ते आम्ही सूरजागडमध्ये बघत आहोत. त्यामुळे प्रशासनाला विकासच करायचा असेल तर आधी याभागात शाळा,रस्ते,आरोग्य सुविधा आदी विकसित कराव्या, गौण वन उपाजावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारावे. पण खाणी सुरू करून परिसर उध्वस्त करू नये अशी मागणी ग्रामसभांनी केली आहे.

सूरजागडमध्ये स्थानिकांचा विरोध डावलून, पेसा सारखे कायदे पायदळी तुडवून बळजबरीने खाण सुरू करण्यात आली. आज तो परिसर आणि त्याभागातील जंगल उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. रोजगार आणि विकास केवळ कागदावर आहे. ती परिस्थिती आमच्या भागात नको. म्हणून आमचा विरोध आहे. विकास करायचा असेल तर आधी येथील पायाभूत सुविधा सुधारा.- समारु कल्लो, महाग्रामसभा सदस्य, कोरची.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 13:58 IST
Next Story
अ. भा. मराठी साहित्य संमेलन: शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा