नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या तटस्थ भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेकदा पक्षाच्या विरोधात जाऊनही भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नेते त्यांचे मित्र आहेत. तसेच, त्यांचे इतरही पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे अनेकदा दिसून आले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात सारे काही आलबेल नसल्याची चर्चा अनेकदा प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात असते.

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेमधील एक व्हिडिओ काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओमध्ये काय आहे ते पाहूया…

काँग्रेस नेते आलोक शर्मा आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून लोकसभेतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल केला जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच लोकसभेच्या सदस्य प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. लोकसभेचे खासदार तरुण गोगोई यांनीही गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर विविध आरोप केले होते.

या सर्वांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले. लोकसभेतील मोदींच्या दीड तासाच्या भाषणानंतर ते सभागृहातून जात असताना सत्ताधारी बाकावरील सर्व खासदार उभे होऊन मोदींना भेटायला आले. सर्व खासदार आणि केंद्रीय मंत्री त्यांना अभिवादन करत होते. मात्र नजीकच्या बाकावर असलेले नितीन गडकरी उभे झाले, परंतु त्यांना अभिवादन करताना दिसले नाही. त्यामुळे नितीन गडकरींचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले की , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी (२८ जुलै २०२५) आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरची तुलना १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाशी केली होती. पण १९७१ मध्ये राजकीय इच्छाशक्ती होती. अमेरिकेचे सातवे नौदल भारताकडे निघाले होते आणि नंतर पंतप्रधान म्हणाले की, आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही करू. महासत्ता येत होती, पण पंतप्रधान म्हणतात की आम्हाला काही फरक पडत नाही.”

आलोक शर्मा यांचा आरोप काय?

काँग्रेस नेते आलोक शर्मा यांनी आरोप केला आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठीचा कणा हा ताट असेल. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर वाकले नाहीत. अन्य नेते वाकून मोदींना नमस्कार करत आहेत. अशा शब्दात आलोक शर्मा यांनी उपरोधिक टीका केली.