वर्धा : सेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, एक काँग्रेस व एक भाजपचा असे प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष आता ग्रामीण भागातून नियुक्त झाले असल्याने पक्षीय राजकारणास खऱ्या अर्थाने ग्रामीण रंग चढला आहे. एक तपापूर्वी प्रमुख राजकीय पक्षाचे जिल्हा सूत्रधार म्हणजे जिल्हाध्यक्ष हे जिल्हा मुख्यालयी म्हणजे वर्धा निवासी असायचे.
कारण पक्षाचा कारभार करायचा तर जिल्हा मुख्यालय हे सर्वांना सोयीचे ठरते, असा विचार त्यामागे असे. आता तर हे चित्र दिसेनासे झाले आहे. गावात राहून आपले कर्तृत्व गाजवीत जिल्ह्यावर छाप पाडणारी कामगिरी ग्रामीण भागातून आलेले नेतृत्व करीत असल्याचे खेड्यांचा देश म्हटल्या जाणाऱ्या भारतातील गौरवास्पद चित्र म्हटल्या जावू शकते.
भाजपचे तीन महिन्यापूर्वी नियुक्त जिल्हाध्यक्ष संजय गाते हे पुलगाव निवासी आहेत. तसे ते त्याआधी संघ वर्तुळतील म्हणून जिल्हाभर फिरायचे. आता कसे होणार, या कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर जिल्हा कार्यालय प्रमुख श्रीधर देशमुख म्हणतात की गाते जिल्हा मुख्यालयी असलेल्या पक्ष कार्यालयात नियमित येतात. पुलगाव निवासी असल्याने अडचण अशी काही बाब नसल्याचे देशमुख दावा करतात. त्यांच्या आधी सुनील गफाट हे तर आंजी या लहान गावातील होते. पण जिल्हाभर त्यांनी छाप सोडली होती, असे त्यांचे समर्थन पक्ष नेते करतात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर हे तर अस्सल ग्रामीण व्यक्तिमत्व. डोक्यास पागोटे व खांद्यावर शेला टाकून पक्ष बैठकीत बसणारे चांदुरकर बोलतात पण वऱ्हाडी ढंगातच.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनियुक्त अध्यक्ष अतुल वांदिले हे हिंगणघाटचे. स्वकर्तृतवार पूढे आलेले हे नेतृत्व म्हटल्या जाते. त्यांच्या नियुक्तीने खळबळ उडाली आहे. नेतृत्व जिल्ह्याबाहेर गेल्याने विरोधी गट अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. याच हिंगणघाट येथे यांचे विरोधी अजित पवार राष्ट्रवादीचे शरद सहारे हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते तर वाघोली या खेड्यातून पक्षाची धुरा सांभाळत आहे.
सेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर हे पुलगावचे तर ठाकरे गटाचे एक राजू खुपसरे हे हिंगणघाटचे तर दुसरे आशिष पांडे हे पुलगावचे. अपवाद एकच तो म्हणजे शिंदेचे दुसरे जिल्हाप्रमुख राजेश सराफ हेच वर्धा मुख्यालयी आहेत. हिंगणघाट येथे तीन पक्षाचे तर पुलगावला दोन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे जिल्हाध्यक्ष महत्वाची जबाबदारी पार पाडणार. कारण तिकीट वाटपाची व युती करण्याची निर्णय क्षमता यांच्याकडे राहणार.
भाजपचा अपवाद वगळता अन्य बहुतेक पक्षात गट तट आहेच. भाजपमध्ये गट असले तरी शेवटी वरिष्ठ लक्ष ठेवून असल्याने व काही गडबड झाल्यास लक्षात ठेवणारे असल्याने जिल्हाध्यक्ष फारसे स्वातंत्र्य घेत नसल्याचा इतिहास आहे. इतर म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीत गट एकमेकांवर कुरघोडी करीत असल्याने जिल्हाध्यक्ष निर्णयाक ठरतात. आता यांच्यामुळे इगोत राहणाऱ्या शहरी काही नेत्यांना गावातील धूळ बघावी लागणार.