नागपूर : घरात अठराविश्वे दारिद्र्य… घरातील पुरुषांना व्यसन… परिस्थितीशी संघर्ष करत आणि आयुष्यभर काबाडकष्ट करून जीवनात समाधान शोधणाऱ्या घरगुती महिला कामगार आयुष्यात पहिल्यांदा विमानाच्या पायऱ्या चढणार आहेत. आयुष्यात कधी त्यांनी रेल्वेने देखील प्रवास केला नाही, पण ‘जिवाची मुंबई- श्रमाची आनंदवारी’ करण्यासाठी त्या विमानाने रवाना झाल्या आहेत.रसिकाश्रय ही यवतमाळ येथील सामाजिक कार्यात अग्रेसर संस्थेकडून हा उपक्रम राबवला जात आहे. मागील वर्षी सुमारे २५ जणांना ‘जिवाची मुंबई’ घडवून आणली. आता यवतमाळ जिल्ह्यातील २० महिला कामगारांना ‘श्रमाची आनंदवारी’ घडवून आणत आहेत.

दररोज सकाळी उठून घरोघरी धुणीभांडी करतात. ज्या घरी काम करतात त्या घरचे शिळे अन्न विनातक्रार ग्रहण करतात. शिवाय घरात अठराविश्व दारिद्र्य आणि घरातील पुरुषांचे व्यसन या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना आनंद देण्यासाठी ‘जीवाची मुंबई-श्रमाची आनंदवारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

२० निवडक महिलांना नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास करायला निघाल्या आहेत. या महिलांना मुंबईची चौपाटी, समुद्रकिनारे, मराठी अभिनेत्यांची, मुख्यमंत्र्यांशी भेट घडवली जाणार आहे. यावेळी या महिलांमध्ये एकीकडे मुंबईला विमानाने जाण्याचा आनंद तर दुसरीकडे डोळयात आनंदाश्रू होते.रसिकाश्रय ही यवतमाळ येथील सामाजिक संस्था आहे. संस्थेकडून यवतमाळ जिल्ह्यातील २० महिला कामगारांना ‘श्रमाची आनंदवारी’ घडवून आणली जात आहे.

पहिल्यांदा स्वत:साठी आनंद शोध

दारूड्या पतीला कंटाळून गेल्या १८ वर्षांपासून आईकडे मुलाला घेऊन राहते. धुणीभांडी करून महिन्याला नऊ हजार रुपये कमावते. महागाईत घर चालवणे खूप कठीण आहे. पहिल्यांदा कुठेतरी स्वत:साठी आनंद शोधणार आहे. रजनी एडेंटीवार, (३५ वर्षे, घाटंजी )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://twitter.com/LoksattaLive/status/1889200731691049298

मुंबईला जाण्याचा आनंद

घरात एक मुलगा, सून, एक नात आणि नातू आहे. वयाच्या पंचाहत्तरीत पोहोचली आहे. नीट सरळ चालता देखील येत नाही. तरीही धुणीभांडी करते. महिन्याला २५०० रुपये कमवून कुटुंबाला हातभार लावते. आयुष्यात कधी रेल्वेची पायरी त्या चढली नाही. मात्र, मुंबईला जाण्याचा आनंद आहे. इंदूबाई बावणे, (७५ वर्षे, घाटंजी )