लोकसत्ता टीम

नागपूर : प्रामाणिक प्रयत्नातून उभारलेल्या सेवेद्वारे समाजाच्या दुसऱ्या घटकाला सतत मदत मिळते. त्यामुळे अशा कार्यासाठी गरज पडल्यास देणगी मागायला कुणालाही लाज वाटायला नको, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ व हृदयरोग विभाग केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, उपाध्यक्ष पराग सराफ उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, कोणतीही समाजसेवा असो ती एकदा सुरू झाल्यावर कायम रहायला हवी. समाजातील सक्षम लोकांकडून देणगीच्या स्वरूपात मदत मिळते. परंतु या संस्थांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचायला हवी. या देणगीतून गरजूंचे जीव वाचवले जाऊ शकतात.

आणखी वाचा- ५ वाघांचे एकत्र दर्शन, नागझिरा अभयारण्यातील पर्यटकांमध्ये आनंदाची लाट

खापरीतील स्वामी विवेकानंद मिशन रुग्णालयाचेही असेच आहे. स्वयंसेवकांनी या रुग्णालयाची गरज बघता पूर्ण क्षमतेने मदत केली. आता येथे सुंदर रुग्णालय तयार झाले आहे. सेवेचा दर्जाची चांगला आहे. तो नेहमी दर्जेदारच असायला हवा. सध्या व्यावसायिक रुग्णालये गरिबांना दारात उभेही करत नाहीत. परंतु स्वामी विवेकानंद मिशन सारख्या रुग्णालयात माफक दरात गरिबांवर दर्जेदार उपचार होतात. या पद्धतीच्या सेवा नेहमीच वाढत रहायला हव्यात. सध्या समाजात नकारात्मक चर्चा जास्त होतात. परंतु त्याहून जास्त चांगल्या गोष्टी घडतात. या चांगल्या गोष्टी पुढे आणायला हव्यात. चांगल्या गोष्टींचे प्रमाण वाढल्यास वाईट गोष्टी समाजातून कमी होतील, असेही डॉ. भागवत म्हणाले.

आणखी वाचा-चोरट्यांचा आता आमदाराच्या घरावर डोळा, समीर कुणावारांकडून पोलीस तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण, औषधोपचार मूलभूत गरज- फडणवीस

पन्नास वर्षांपूर्वी देशात अन्न- वस्त्र- निवारा ही मूलभूत गरज मानली जात होती. परंतु आता शिक्षण- उत्पन्न- औषधोपचार ही मूलभूत गरज झाली आहे. त्यामुळे विविध पद्धतीचा उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात असायला हवा. त्यासाठी स्वामी विवेकानंद मिशन रुग्णालयासारख्या नि:स्वार्थ संस्थांची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.