नागपूर : नागपूरसह विदर्भवासीयांना येत्या नववर्षात दुहेरी गॅस पाईपलाईनचे गिफ्ट मिळणार आहे. पुढील तीन महिन्यात नागपूर पश्चिम भागातील पोर्टसह पूर्व भागातील पोर्टलाही ‘कनेक्ट’ होत असल्यामुळे थेट पाईपलाईनच्या माध्यमातून नागपूरकरांना गॅसचा अविरत पुरवठा होईल.

पूर्व किनारट्टीवरील ओडिशामधील अदानी समूहाच्या धामरा पोर्टच्या माध्यमातून नागपूरच्या भविष्यातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण होणार आहेत. गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) मुंबई ते झारसुगुडा (ओडिशा) पर्यंत नैसर्गिक वायूची पाइपलाइन टाकत असल्याने पश्चिम व पूर्व दोन्ही किनाऱ्यावरून गॅस मिळणार आहे.

पश्चिम किनाऱ्यावर तरल नैसर्गिक वायू (एलएनजी) टर्मिनल रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये तर पूर्व किनाऱ्यावर ओडिशातील धामरा पोर्ट आहे. दाभोळ मुंबईतील पाईपलाईनशी तर धामरा झारसगुंडा येथील पाईपलाईनशी जुळलेला आहे. नागपूरला दाभोळहून गॅस मिळेल. नागपूर-जबलपूर व नागपूर-झारसुगुडा पाइपलाइन पुढील दोन ते तीन महिन्यांत तयार होतील. झारसुगुंडा आधीच धामराशी गॅस पाइपलाइनद्वारे जोडलेले आहे आणि त्यानंतर नागपूरलाही धामराहून गॅस मिळू लागेल.

‘धामरा’शी जुळल्याने नागपूरला फायदा

धामरा एलएनजी टर्मिनलची क्षमता प्रतिवर्ष ५० लाख टन (एमटीपीए) आहे. आतापर्यंत धामरामध्ये एकूण २३ लाख टन एमटीपीए हाताळले आहे आणि त्यामुळे विदर्भाची गॅसची गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी क्षमता उपलब्ध आहे. हे टर्मिनल २०२३ मध्ये ६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीने सुरू झाले होते, जे १० हजार कोटी रुपयांत बांधलेल्या धामरा पोर्टचाच एक भाग आहे. एलएनजी कतारहून आयात केली जाते आणि धामरामध्ये रिगॅसिफाय केली जाते. टर्मिनलवर ही एलएनजी-१६५ अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाते. याचे तापमान नियंत्रित करून ते द्रवरूपातून वायुरूपात बदलले जाते आणि नंतर गेलला पुरवठा केला जातो. अदानीचे एलएनजी टर्मिनल रिटेल, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी गॅस उपलब्धतेत वाढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. सफ्रान्सच्या टोटल एनर्जीजच्या भागीदारीत हा पोर्ट सुरू करण्यात आले आहे. धामरा पोर्टशी थेट कनेक्ट झाल्यामुळे नागपूरकरांना कमी दरात गॅस पुरवठा होईल.

युद्ध थांबणारच तरच किंमत कमी

पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठा ही भविष्यातील मुख्य ऊर्जेचे स्त्रोत आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या रशिया व युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नॅचरल गॅसच्या किंमती वाढलेल्या आहे. भारतात बहुतांश गॅस ही जहाजांच्या माध्यमातून आणली जाते. त्यामुळे जोपर्यंत युद्ध संपत नाही, तोपर्यंत किंमती कमी होणार नाही, अशी कबुली अदानी समुहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे, भारतात मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे. मात्र स्टील उत्पादनासाठी हा कोळसा त्या दर्जाचा नसल्याने भारताला तो आयात करणे भाग आहे. यासाठी अदानी समुहाचा धामरा पोर्ट महत्वाची भूमिका बजावत आहे. जहाजाच्या माध्यमातून पोर्टवर आलेल्या कोळशासह इतर वस्तुंच्या जलद वाहतूकीसाठी अदानी समुहाने स्वत: ६२ किलोमीटरची रेल्वे लाईन धामरामध्ये टाकलेली आहे. ही रेल्वे लाईन चेन्नई व हावडा या मुख्य लाईनला जोडलेली आहे. सध्या येथे मुख्यतः आयर्न ओर, कोळसा आणि एलएनजी हँडलिंग केली जाते. पूर्व भारतातील आयर्न ओर व कोळशाच्या वाढत्या मागणीचा विचार करून अदानी समूहाने पोर्टच्या विस्तारासाठी आणखी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.