यवतमाळ : सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सर्वसामान्य, शेतकरी यांच्यासह मराठी भाषेचे मरण अटळ आहे, अशी घणाघाती टीका प्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी येथे केली. यवतमाळ जिल्हा साहित्य मंचाद्वारे आयोजित पहिल्या यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष, शिक्षक नेते मधुकर काठोळे, कवी नीलकृष्ण देशपांडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील लेखक, कवींनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाचे शिवधनुष्य पेलले, असे गौरवोद्गार यावेळी डॉ. बेग यांनी काढले. पूर्वी काँग्रेस आणि आता भाजप या दोन्ही सरकारच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कायम आहे. त्यातच आता भाषिक व अन्य सामजिक वादामुळे सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे मरण होत आहे. यात मराठी भाषाही इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती फोफावल्याने गुदमरून मरत असल्याची टीका बेग यांनी केली. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सत्तेत आलेल्या भाजपच्या काळात शेतकरी आणखी अडचणीत आला.

हेही वाचा: शिवसेना प्रमुखांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

हीच अवस्था मराठी आणि बोलीभाषेची आहे, असे ते म्हणाले. वऱ्हाडीसारख्या असंख्या बोलीभाषा नामशेष होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, आपल्याला गेली ५० वर्षे वऱ्हाडी बोलीनेच जगवले, असे ते म्हणाले. समाजातील शोषणाविरुद्ध लेखक, कवींनी व्यक्त होण्याचे आवाहन यावेळी कवी मिर्झा बेग यांनी केले. उद्घाटनपर भाषणात माजी मंत्री वसंत पुरके यांनी, साहित्यिक प्रभा गणोरकर यांच्या नागपूर येथील भाषणाचा दाखला देत भाजप सरकार साहित्यिकांवर दडपशाही करत असल्याचा आरोप केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. लेखक, कवींनी स्वप्नरंजनात रमण्यापेक्षा वास्तवावर भर देऊन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून परखड लिखाण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे काम बाकी, तरी उदघाटनाचा घाट; मात्र तरीही समृद्धीवरून थेट प्रवास

यावेळी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग आणि कवी नीलकृष्ण देशपांडे यांना अनुक्रमे ‘साहित्य वऱ्हाड’ पुरस्कार ‘काव्यगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल कुळकर्णी यांनी केले तर संचालन विजय देशपांडे यांनी केले. संमेलनात दिवसभरात दीडशेवर कवींनी सहभाग नोंदवला. संमेलनाध्यक्ष आ. मदन येरावार यांनी संमेलनाकडे पाठ फिरवल्याने भाजप नेते साहित्यिकांपासून दूर का राहतात, याची संमेलनस्थळी चर्चा होती. साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. स्वप्निल मानकर, मंगेश चौधरी, आकाश मारावार, अजित डेहनकर आदींनी परिश्रम घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mirza rafi ahmad beg raise your voice against bjp government oppression and exploitation of literary people yavatmal tmb 01
First published on: 04-12-2022 at 17:16 IST