वर्धा : देशातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य उपचार याबाबत एम्स म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स ही संस्था सर्वोच्च समजल्या जाते. त्यामुळे या ठिकाणी उपचार, किंवा शिक्षणासाठी प्रवेश तसेच नियुक्ती ही बाब अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जात असते. अशी नियुक्ती मिळाली की त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तबच होते. तसेच झाल्याने वर्धेकर वैद्यकीय वर्तुळ तसेच सामाजिक क्षेत्रात आनंद व्यक्त केल्या जात आहे. आणि याप्रकारची अशी ही पहिलीच नियुक्ती असल्याने वर्धेकरांचा उर अभिमानाने भरून आल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या नियुक्ती विषयक कॅबिनेट समितीने व पर्सोनल मंत्रालयाने एम्स संचालक जाहीर केले आहेत. त्यानुसार डॉ. राजन गुप्ता – भतींडा, डॉ. अमिता अग्रवाल – बीबीनगर, ले. ज. दलजीत सिंग – बिलासपूर, डॉ. नितीन गगणे – देवघर, डॉ. अरविंद सिन्हा – कल्याणी व ब्रिगे. राजू अग्रवाल – पाटणा. देशातील काही एम्सचे हे नवे संचालक म्हणून नियुक्त झाले आहे. यापैकी डॉ. गगणे हे विदर्भास सुपरिचित आहे.

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे डीन म्हणून ते बरीच वर्ष कार्यरत होते. त्यानंतर ते कर्नाटकातील बेळगावी येथील केएलई अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत झाले. या नव्या नियुक्तीबद्दल बोलतांना डॉ. गगणे म्हणाले की ही नियुक्ती आनंद देणारी असली तरी आव्हानात्मक आहे. झारखंड सारख्या प्रदेशातील वैद्यकीय संस्थेतील नियुक्ती मिळाल्याने खूप काम करण्याची संधी उपलब्ध होणार.

एम्स ही शासकीय वैद्यकीय संस्था आहे. त्यामुळे शासनाच्या वैद्यकीय शिक्षण सेवेत किंवा आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्यांनाच एम्स संचालकपद प्रामुख्याने मिळते. पण डॉ. गगणे यांची संपूर्ण वैद्यकीय सेवा ही खाजगी वैद्यकीय संस्थेतच आजवर झाली. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर अशी खाजगी संस्थेच्या व्यक्तीची एम्स संचालक होण्याची बाब वैद्यकीय शिक्षण वर्तुळत अपवाद समजल्या जात आहे.

डॉ. गगणे यांनी सेवाग्रामच्याच वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ साली एमबीबीएस पदवी व पुढे एमडी पदवी घेतली. १९८५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेत संशोधन कार्य केले. १९८६ ला सेवाग्रामला प्राध्यापक म्हणून रुजू झाले. काही काळ सावंगीच्या मेघे अभिमत विद्यापीठात सेवा दिल्यानंतर ते परत विभागप्रमुख म्हणून सेवाग्रामला रुजू झाले. २०१४ साली ते काही काळ नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी प्र कुलगुरू राहले. त्यानंतर अधिष्ठाता म्हणून सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत त्यांनी ५ वर्ष सेवा दिल्यानंतर ते बेळगावी संस्थेत कुलगुरू म्हणून रुजू झाले. तिथेच कार्यरत असतांना त्यांना आता एम्सचे संचालक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. डॉ. गगणे यांना वैद्यकीय क्षेत्रात विविध मान सन्मान प्राप्त झाले असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.