अमरावती : संपूर्ण देशात कायदा समान असताना, अमरावती शहर पोलीस प्रशासनाकडून मात्र कायद्याचा असमान वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी पालकमंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांवर दंगल केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. देशमुख यांनी हा सवाल उपस्थित केला.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी शिवसेना (उबाठा) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तीव्र आंदोलन केले होते. निषेध म्हणून त्यांनी कुजलेल्या सोयाबीनच्‍या पेंड्या कार्यालयात आणून टाकल्‍या.मात्र, पोलिसांनी या आंदोलनानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांवर दंगल केल्याचा (कलम ३५३ सह) गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची ही कृती म्हणजे कायद्याचा गैरवापर करून जनआंदोलन दडपण्याचे कारस्थान असून, हा ‘जनतेप्रती द्रोह’ असल्याचा तीव्र संताप डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांवर ‘सौम्य’, विरोधकांवर ‘गंभीर’ कारवाई?काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस बीटी बियाण्यांच्या प्रकरणावरून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन केले होते. त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांवर बियाण्यांचा मारा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, त्यावेळेस पोलिसांनी तुलनेने सौम्य कारवाई करत गंभीर गुन्हे दाखल केले नव्हते.हा पोलीस प्रशासनाचा दुटप्पीपणा असल्याची टीका करत डॉ. सुनील देशमुख यांनी, “संपूर्ण देशात कायदा समान असताना अमरावतीत तो असमान का? असा थेट सवाल विचारला आहे.

‘ज्यांचे घर काचेचे…’

अवैध धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे चव्हाट्यावर आल्याचा आरोप डॉ . सुनील देशमुख यांनी केला. शासनातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांना जाणूनबुजून दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. ‘ज्यांचे स्वतःचे घर काचेचे आहे, त्यांनी असे वर्तन करू नये,’ असा टोला त्यांनी पोलीस प्रशासनाला उद्देशून लगावला.शेतकरी, शेतमजूर आणि जनतेच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्यास जनता त्याविरोधात पेटून उठेल, असा इशाराही डॉ. देशमुख यांनी दिला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्‍या पदाधिकाऱ्यांवरील दंग्याचे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.यावेळी बोलताना डॉ. देशमुख यांनी महाविकास आघाडीतील एकसंधता अधोरेखित केली. शेतकरी आणि जनतेच्या न्यायासाठी भविष्यातही महाविकास आघाडी तीव्र आंदोलने करून अग्रसर राहील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.