लोकसत्ता टीम

अकोला: तूर उत्पादकांना यंदा उच्चांकी दर मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ३५० रुपये भाव मिळाला. खरीप हंगामाच्या तोंडावर तुरीला विक्रमी दर प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून गेली.

तुरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा अनपेक्षितपणे प्रतिक्विंटलला १० हजारांपेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात होणारे भावाचे चढउतार पाहता पूर्ण देशभरात होणारे पीक यावर आता बाजारपेठेतील ठरतात. देशामध्ये यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. बाजारपेठेत आवक कमी होत असल्याने तुरीच्या दराने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा… Vat Purnima: एक वटसावित्री अशीही; महिलांच्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात सोयाबीन, कापसासह तुरीचीही मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. गतवर्षी ५० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसाचा तुरीला फटका बसला. त्यात ऐन फुलधारणेच्यावेळी धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. सुरुवातीपासूनच तुरीला बाजारात चांगला दर मिळाला. सध्या स्थितीत तूर १० हजार रुपये प्रतिक्विंटल दरावर पोहोचली आहे. सरासरी १० हजार ते १० हजार २०० रु प्रतिक्विंटल दर तुरीला मिळतो आहे. अकोला बाजार समितीमध्ये विक्रमी १० हजार ३५० चा दर मिळाला. याठिकाणी एक हजार ८६६ क्विंटल आवक झाली. अकोट बाजार समितीमध्ये दररोज ४०० ते ५०० क्विंटल तूर विक्रीसाठी येत आहे. काही वेळा आवक कमीही असते. तुरीच्या बाजारातील तेजी मात्र कायमच राहते. तुरीचा पेरा गेल्या काही वर्षीपासून सातत्याने घटत असल्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात दर वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

कपाशीच्या दरात घसरण

गेल्यावर्षी कपाशीला १३ हजार रुपये दर मिळाला होता. गेल्या वर्षीचा कापसाच्या दराच्या सुखद अनुभव पाहता बहुतांश शेतकरी वर्ग कपाशीच्या लागवडीकडे वळला होता. कपाशीने शेतकऱ्यांची यावर्षी निराशा केली आहे. यावर्षी कपाशीला सात हजार ते सात हजार ९०० रुपये दरम्यानचा दर मिळत आहे.