अकोला : दमरे व पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ न दिल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे. विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पूर्णा-अकोला मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिमेकडील ओखा, व्दारका, सोमनाथ यांना दक्षिण भारतातील नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा, हैदराबाद या शहरांना जोडण्यासाठी दमरे व पश्चिम रेल्वेकडून काचीगुडा-बिकानेर, ओखा-मदुरै, हैदराबाद-जयपूर विशेष, राजकोट ते महबूबनगर (तेलंगणा) दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू केल्या होत्या. रेल्वेगाड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळूनही रेल्वे विभागाने या गाड्यांना मुदतवाढ न दिल्याने आता या रेल्वेगाड्यांची शेवटची एक-एक फेरी होणार आहे. या विशेष रेल्वेगाड्यांमुळे हजारो भाविकांना ओखा, व्दारका, सोमनाथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, शेगाव येथील गजानन मंदिर, औंढा नागनाथ, हिंगोली येथील आठवे ज्योतिर्लिंग, नांदेड येथील सचखंड गुरुवदरा, बासर येथील सरस्वती मंदिरकरिता सोय झाली होती. तसेच अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी, निजामाबाद, हैदराबाद येथील व्यापाऱ्यांना गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, जयपूर येथे जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी मिळाल्याने त्याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांना झाला.

हेही वाचा – गोंदिया : गणेशोत्सवावर चांद्रयानाची छाप; रॉकेट, विक्रम लॅडर अन् प्रज्ञान रोव्हरच्या प्रतिकृती ठरताहेत लक्षवेधी

पहिल्या फेरीपासूनच या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. मात्र, प्रचंड प्रतिसाद मिळूनही रेल्वेकडून अद्याप या विशेष गाड्यांचा अवधी वाढवण्यात आला नाही. रेल्वेगाड्या बंद झाल्यास हजारो व्यापारी, भाविक आणि प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागेल. रेल्वेगाड्यांना मुदतवाढ देऊन विशेष जागी कायमस्वरुपी करण्याची मागणी व्यापारी आणि हिंदू भाविकांनी केली आहे. ट्रेन कायमस्वरुपी केल्याने ट्रेन उशिराने धावण्याला आळा बसेल, तिकिटाचे दरही कमी होतील. त्याचा व्यापारी आणि भाविकांना फायदा होईल. रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी विभागातील खासदारांसह डीआरयूसीसी सदस्य राकेश भट्ट, वाशीमचे महेंद्रसिंग गुलाटी, अकोल्याचे ॲड. ठाकूर, ॲड. अमोल इंगळे, अतुल जैस्वाल यांनी केली आहे.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील २८३ उद्योग ‘रेड झोन’मध्ये, तर ७०८ ग्रीन अन् ३५४ ऑरेंज झोनमध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकोट-महबूबनगर गाडी बंद

गाडी क्रमांक ०९५७५/०९५७६ राजकोट-महबूबनगर विशेष गाडी १० एप्रिल ते ३१ ऑगस्ट दरम्यान चालवण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या रेल्वेला मुदतवाढ न दिल्याने ही रेल्वे बंद झाली आहे.