भंडारा : पोळ्याचा आनंद ओसंडून वाहत असताना शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दुसऱ्या एका घटनेत एका तरुणाचा वैनगंगा नदीत बुडवून मृत्यू झाला. या दोन घटनेने पोळा सणाला गालबोट लागले आहे.

भंडारा जिल्ह्यातील शिंगोरी शिवारामध्ये नाल्याच्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. किसन भानुदास गायधने (वय ३६) असं मृताचं नाव आहे. किसन २० ऑगस्टला सायंकाळी आपली जनावरे बांधण्यासाठी शेतावर गेले होते. सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शुक्रवारी नाल्यातील पाणी कमी झाल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला.

दुसरी घटना भंडारा शहराजवळील खमारी (बुटी) येथे घडली. वैनगंगा नदीत बुडून निलेश रामू मारवाडे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. निलेश हे २० ऑगस्ट रोजी सकाळी घरून निघाले होते. रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. कारधा पोलिसांत तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता वैनगंगा नदीच्या झिरी घाटावर त्यांचा मृतदेह आढळला. कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

विदर्भातील गडचिरोली, अकोला आणि भंडारा जिल्ह्यात तीन जणांचा वाहून मृत्यू झाला आहे. . मृतांमध्ये तर एका सहा वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. एकुलता एक रिशान गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला आहे. कुटुंबियांचा आक्रोश बघून उपस्थितांचे पण डोळे पाणावले आहेत.