कोथिंबीर २०० तर रजनीगंधा ५०० रुपये किलो

नागपूर : गणरायाचे आगमन झाले असून महालक्ष्मीचीही प्रतिष्ठापना आज झाली. त्यामुळे सर्वत्र फळ-भाज्यांसह फुलांची मागणी वाढली आहे. मात्र या तुलनेत आवक कमी असल्याने फळभाज्या, फुले यांचे दर चांगलेच वाढलेले आहे. सणासुदीच्या काळात दर आटोक्याबाहेर गेल्याने सर्वसामन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरात सध्या सणासुदीमळे बाजारात काही प्रमाणात रेलचेल आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. मंगळवारी महालक्ष्मींची स्थापना झाल्याने बाजारात खरेदीचा जोर आला आहे. घरोघरी पूजेसाठी फुलांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. मात्र जिल्ह्यत फुलशेती कमी प्रमाणात होत असल्याने बाजारात इतर राज्यातून फुलांची आवक होत आहे. सजावटीच्या फुलांचे दर जास्त वाढलेले आहे. बाजारात पुणे, बंगळुरू, िहगोली, नाशिक, अहमदनगर येथून विविध फुले विक्रीसाठी येतात. जवळपास दीडशे छोटय़ा-मोठय़ा गाडय़ांची आवक दररोज होते. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशसह छत्तीसगड येथे याच बाजारातून मोठय़ा संख्येने फुले पाठवली जातात. यामध्ये झेंडू, डस रोज, गुलाब, निशिगंधा, शेवंती आदींची नेहमी मागणी बाजारात असते. गणेशोत्सवामुळे सध्या फुलांची मागणी दुप्पट झाली आहे. सध्या शेवंतीचे दर ४०० रुपये किलो तर रजनीगंधा ५०० रुपये किलो आहे.

महालक्ष्मीच्या माळांची जोडी २ हजाराच्या घरात पोहचली असून निशिगंधाचा छोटा हार शंभर रुपयांच्या घरात आहे. त्याशिवाय भाज्यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. भाज्यांची चव वाढवणारा कोथिंबीरचा घाऊक दर थेट १६० रुपयांवर पोहचला असून किरकोळचा दर २०० रुपये किलो एवढा आहे. सध्या शेतात भाज्यांची लागवड  सुरू असल्याने केवळ २० टक्के भाजीपाला जिल्ह्यतून येत असून उर्वरित ८० टक्के बाजीपाला परराज्यातून येत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहे. हिरवी मिरची घाऊकमध्ये ७० रुपये असून किरकोळ दर शंभर रुपये किलो आहे. इतरवेळी १० रुपये किलो मिळणारी वांगी सध्या ४० रुपये किलोवर पोहचली आहेत. टोमॅटो ८०, फुलकोबी ५०, पानकोबी ५०, पालक व मेथी तर नांदेड व मध्यप्रदेशातून येत असल्याने ७० रुपये किलोने मिळत आहे. कारले ८०, परवळ ६०, कोहळे ५०, लवकी ३०, तेंडुळे ५० तर शिमला मिरची ७० रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वज भाज्यांचे दर चांगलेच वाढल्याचे चित्र आहे. पुढील महिनाभर भाज्यांचे दर असेच तेजीत असतील असे घाऊक विक्रेते सांगतात.

सध्या शेतात पिकांची लागवड सुरू असल्याने केवळ २० टक्के भाजीपाला नागपूर जिल्ह्यातून येत असून बाकी इतर जिल्ह्यतून येत आहे.त्यामुळे सर्व भाज्या महागल्या आहेत. ऑक्टोबपर्यंत भाजीचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

– राम महाजन, ठोक विक्रेता कॉटन मार्केट.

यंदा टाळेबंदीमुळे फुलशेतीला मोठा फटका बसला. बियाणे मिळाले नसल्यामुळे स्थानिक फुलशेती बहरली नाही. अशात आता सणासुदीत मागणी जास्त असल्याने फुलांची भाववाढ  झाली आहे. आपल्याकडे बंगळुरू, नाशिक नगर येथून फुले येत आहेत. ४०० रुपये किलोला मिळणारी शेवंतीची मागणी जास्त असून पंधरा दिवसांनी फुलांचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

– विजय वंजारी, अध्यक्ष, उत्पादक ठोक व चिल्लर पुष्प विक्रेता संघ बर्डी