वर्धा : किसान अधिकार अभियानच्या १७ व्या बळी महोत्सवात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विचार व्यक्त करतांना बळीचे राज्य यावर भूमिका मांडली.

किसान अधिकार अभियानतर्फे आयोजित १७ वा “बळी महोत्सव ” महात्मा लॉन, नालवाडी येथे उत्साहात पार पडला. आमदार आव्हाड म्हणाले की, इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो म्हणजे आजच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेचं राज्य सक्षम होवो, असा अर्थ होतो. सध्याचं भारतीय जनता पक्षाचं शासन मनुवादी व वामन प्रवृत्तीचं शासन आहे. या शासनकाळात शेतकरी, कामगार, महिला आणि सामान्य नागरिकांचा बळी घेतला जात आहे. बळीराजाचं राज्य म्हणजे समतेचं, श्रमाला सन्मान देणारं, न्याय्य समाजाचं राज्य होय.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा समाजातील शेतकरी आणि महिलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यावेळी मनुवादी प्रवृत्तीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच धर्तीवर आजच्या सत्ताधाऱ्यांनीही संविधान आणि लोकशाही मूल्यांवर हल्ला केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेलं संविधान हेच बळीराजाचं शास्त्र आहे. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे नेते आहेत. आज संविधान अडचणीत असून, जनतेने जागृत होऊन संघटित लढा उभारला पाहिजे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी सांगितले की,बळी महोत्सव हा दिवाळीच्या दिवशी श्रमिकांच्या प्रश्नांवर चिंतन करण्यासाठी आणि लढ्याचं नियोजन करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो.गेल्या १७ वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या हक्कांसाठी हा आंदोलनाचा मंच ठरला आहे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खासदार अमरभाऊ काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकासजी लवांडे, किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, नाट्यदिग्दर्शक हरीष इथापे, जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण भोयर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, माजी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, सिपीआयच्या जिल्हा सचिव द्वारका इमडवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर, जमाते इस्लामी हिंदचे नियाज अली, आदिवासी काँग्रेस कार्याध्यक्ष नरेंद्र मसराम, युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, गांधी विचार सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शर्मा, अवधेश क्रीडा मंडळ सचिव डॉ. विनय मून, राजीव वानखेडे , शाहिर धम्मानंद खडसे , सत्यशोधक समाजाचे गुणवंत डकरे , जनार्दन देवतळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी केले. संचालन सचिव प्रफुल कुकडे आणि आभार प्रदर्शन संघटक गोपाल दुधाने यांनी केले.

कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात श्रमिक आणि बळी संस्कृती जोपासण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सन्मानित व्यक्तींमध्ये मागील दोन दशक काम करणारे किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत नाट्यदिग्दर्शक हरीष इथापे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजीव वानखेडे, शेतिनिष्ठ राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी संदीप शेंद्रे, पाणी फाउंडेशनचे विदर्भ प्रमुख भूषण कडू आणि मागील एक दशकापासून क्रीडा क्षेत्रात राज्यातील युवकांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणारे डॉ. विनय मून यांचा बलि महोत्सव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या सफलतेसाठी संघटक गोपाल दुधाने,उपाध्यक्ष विठ्ठल झाडे,सचिव प्रफुल कुकडे, प्रा प्रवीण भोयर चंद्रकांत ढगे, अभिजीत नाखले,सचिन ढगे, चंद्रशेखर दुर्गे,इरफान अली, उमेश नारांजे,सतीश वडतकर, राष्ट्रपाल गणवीर, नीरज ताकसांडे,प्रवीण कांबळे,आकाश भुरे आदींनी परिश्रम घेतले.