वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे बेधडक व्यक्तिमत्व असल्याची ओळख. अधीकारी वर्गाकडून चोख हिशेब घेत फैलावर घेणारे, अशीही त्यांची ख्याती. पण आज जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पवारांनी अधिकारी बैठक शांततेत आटोपली तर पत्रकार परिषद गाजवून सोडली. प्रश्न काय विचारायचे याचेही भान तुम्हास नाही कां, तुमचा अभ्यास काय असे प्रश्न बाहेरून आलेल्या पत्रकारांना करीत दादांनी जिल्ह्यात काय यावर बोला असे हौशीना सुनावले. पुढे आलेला प्रत्येक प्रश्न आणि त्यावर दादांचा प्रतिप्रश्न असेच चालले.
सदर प्रतिनिधिने थकीत बिले व कंत्राटदार संघटना आंदोलन व कंत्राटदारचा आत्मदहन ईशारा यावर विचारणा केल्यावर अजितदादा म्हणाले की चिंता नको. कालच मी या विषयावर चर्चा केली. सचिव मनिषा म्हैसकर व अन्य अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. साडे सात हजार कोटी तरतूद होईल. थकीत बिल राहणार नाही. एक वित्तमंत्री म्हणून मी ग्वाही देतो. पुढे जिल्ह्यातील दारूबंदीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यावर प्रश्न आला. त्यावर बोलतांना अजितदादा यांनी खणखणीत स्वरात भूमिका मांडतांना स्पष्ट केले की भलेही महसूल बुडाला तरी बेहत्तर पण दारूबंदी उठणार नाहीच. हा गांधी जिल्हा वारसा ठेवून आहे. म्हणून बंदी. काही अवैध विक्रीने प्रश्न निर्माण होत असतील तर त्यावर पोलीस विभागाशी चर्चा करून उपाय करू. जिल्ह्यात काही उद्योग लावण्यास पर्यावरण हेतूने अडचणी असतील. पण कापूस प्रक्रिया उद्योग सारखे ईथे लावता येतील, यावर चर्चा झाली आहे. सेवाग्राम विकास आराखडा आता या वर्षी नव्याने मान्यता घेत सुधारित स्वरूपात येईल. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी काही सूचना केल्या. त्या योग्य वाटल्याने त्याचा समावेश या सुधारित आराखड्यात केल्या जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
हिंगणघाट येथील पालिका कार्यक्रमात खासदार अमर काळे यांनी पालकमंत्री ( डॉ. पंकज भोयर ) आमच्या कामास निधी देत नसल्याचा आरोप करीत आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत देऊन चुकले आहे. त्यावर सदर प्रतिनिधिने विचारणा केल्यावर दादांनी थेट प्रश्न केला, जिल्हा नियोजन मंडळ कश्यासाठी हो.
आमदार खासदार असे उत्तर दिल्यावर ते म्हणाले की हा विकास निधी विनियोग आमदारांच्या शिफारसीने होणार. राज्याच्या विकासाचा प्रश्न आहे. खासदारांनी केंद्राच्या निधीवर बोलावे. त्यासाठी जिल्हा दक्षता समिती असते. जिल्हा नियोजन मंडळात आमदार सांगणार तेच होणार. खासदार इशारा देत असतील तर त्यांनी त्यांचे अधिकार समजून घेतले पाहिजे असा टोला अजितदादा पवार यांनी खासदार अमर काळे यांना लगावला. बिनफुकाचा ईशारा काय कामाचा असे त्यांनी म्हणताच त्यांच्या लगतच बसलेले आमदार कुणावार यांना हसू आवरले नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दादांना एक प्रश्न आल्यावर हलक्या आवाजात दिलेली माहिती चांगलीच उपयुक्त ठरली आणि दादांनी सुटकेचा निश्वास सोडला.