लोकसत्ता टीम
नागपूर : पर्यावरणाविषयी सारेच जागरुक होत आहेत, पण चिमुकल्यांना ही जाणीव जरा अधिकच. यंदाच्या गणेशोत्सवात वाचल्यानंतर रद्दी म्हणून दिले जाणारे वर्तमानपत्र, थोडी शुद्ध माती आणि नैसर्गिक रंगांतून त्यांनी गणेशाची मूर्ती साकारली. ही मूर्ती अवघ्या नागपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह लक्ष्मीनगर नागपूर व पितळे शास्त्री हायस्कूल प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक अनंत नानोटी, पराग सोनट्टके व वसतिगृह अधीक्षक दिनेश शेराम यांच्या मार्गदर्शनात वसतिगृहाचा माजी विद्यार्थी विक्की अंबाडरे यांनी वाचल्यानंतर रद्दी म्हणून टाकले जाणारे वर्तमानपत्र व नैसर्गिक रंगापासून तयार केलेला कागदाचा गणपती व वर्ग नववीचा वसतिगृहात निवासी विद्यार्थी ईशांत बोपचे याने शुध्द माती व नैसर्गिक रंगाचा वापर करून तयार केलेल्या ‘इको फ्रेंडली’ गणपतीची स्थापना करण्यात आली. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वैभव मडावी यांच्या मार्गदर्शनात आदिवासी महिला बचत गटांनी तयार केलेला आरोग्यदायी प्रोटीन युक्त मोह फुलाचा मोदक नैवेद्य म्हणून अर्पण केला.
आणखी वाचा-पावसापासून बचावासाठी घेतला झाडाचा आधार अन् पुढे घडला अनर्थ…
अनंत चतुर्दशीला मातीच्या मूर्तीचे वसतिगृहात पाण्याच्या टाकीत विसर्जन करून माती झाडांना टाकण्यात येणार आहे. कागदी गणपती वसतिगृहात नेहमीच्या दर्शनासाठी संग्रही ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुजेकरीता सर्व नैसर्गिक साहित्याचा उपयोग करून पर्यावरणाचा कृतीतून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी वसतिगृह कर्मचारी शुभांगी उईके, गणेश करणाहकें व निवासी विद्यार्थी सहकार्य करत आहेत.